तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा हेतू
उधव कृष्ण, प्रतिनिधी पाटणा, 28 जून : तृतीयपंथींच्या नशिबी आतापर्यंत अपमानाचं जगणं आलं. विविध संघटनांच्या अथक प्रयत्नांनंतर आता कुठे त्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेतलं जात आहे. अशातच एक आगळीवेगळी पण विशेष अशी बातमी समोर आली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यात खास तृतीयपंथींचं एक रेस्टॉरंट सुरू झालं आहे. येथे सर्वजण येऊन विविध पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील. या रेस्टॉरंटमध्ये आचाऱ्यांपासून वेटर आणि व्यवस्थापकांपर्यंत सर्व तृतीयपंथी कामगार कार्यरत आहेत. तृतीयपंथींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेविका रेश्मा प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या विविध भागांमध्ये तृतीयपंथी समुदायाकडून रेस्टॉरंट आणि कॅफे सुरू आहेत. आता बिहारमध्ये उघडलेलं हे अशाप्रकारचं पहिलंच रेस्टॉरंट आहे, ज्याला ‘सतरंगी दोस्ताना रेस्ट्रो’ असं नाव देण्यात आलं आहे. येथे भारतीय जेवणासह चायनीज पदार्थही उपलब्ध असतील.
तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आमचा हेतू आहे, असं रेश्मा प्रसाद म्हणाल्या. त्याचबरोबर इतर भागांमध्येही असे रेस्टॉरंट सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. गांधी मैदानावरील मोना चित्रपटगृहाच्या मागची जमीन हे रेस्टॉरंट बांधण्यासाठी दिल्याने त्यांनी बिहार सरकारचे आभारही मानले. या 2 मजली रेस्टॉरंटसाठी त्या 2017पासून लढत होत्या. आता कुठे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलं आहे. संकटांपासून मुक्तीसाठी देवशयनी एकादशीला करा हे उपाय, राशीनुसार दानाचे महत्त्व दरम्यान, या रेस्टॉरंटच्या उद्घाटनाचा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पाटणाच्या महापौर सीता शाहू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.