सोर्स : सोशल मीडिया
मुंबई, 17 जुलै : समाजात हल्ली हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत. विनाकारण हुज्जत घालून वाद वाढवणाऱ्यांची संख्या वाढते आहे. टोल नाक्यांवर हुज्जत घालणाऱ्यांचं प्रमाण मोठं असतं. दिल्लीत ग्रेटर नोएडा इथं नुकतीच अशी एक घटना घडली. विशेष म्हणजे यात वाद घालणाऱ्या दोन्हीही व्यक्ती महिलाच होत्या. टोल नाक्यावर गाडी थांबली, की काही जण टोल कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. काही वेळा प्रकरण तिथेच संपतं; पण काही जण गाडीतून खाली उतरून टोल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात, त्यांना मारण्याच्याही घटना घडतात. दिल्लीत ग्रेटर नोएडामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. एका महिलेनेच महिला टोल कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केलं. हा वाद मारामारीपर्यंत गेला.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात गाडीतून उतरलेली महिला टोल नाक्यावरच्या महिलेशी अनुचित वर्तन करताना दिसते आहे. मारणाऱ्या महिलेसोबत काही माणसंही दिसत आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडाच्या दादरी ठाणे क्षेत्रातल्या लुहारली टोल नाक्यावर हा प्रकार घडला आहे. तिथून एक गाडी जात होती. टोल घेण्यासाठी जेव्हा बॅरिकेड्स बंद झाले, तेव्हा गाडीतल्या व्यक्तींनी टोल भरण्यास नकार दिला. त्यांनी बॅरिकेड उघडण्यासही सांगितलं. त्या वेळी त्या बूथवर एक महिला कर्मचारी टोल घेण्याचं काम करत होती. त्या बूथच्या आजूबाजूला 2 सुरक्षारक्षकही उभे होते. त्याशिवाय इतर काही कर्मचारीही आजूबाजूला उभे होते, असं त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
गाडीतल्या व्यक्तींचा टोल नाक्यावरच्या महिलेशी वाद झाला. त्यानंतर गाडीतून एक महिला उतरली व थेट कर्मचाऱ्यांच्या केबिनमध्ये गेली. महिला कर्मचारी तिच्या खुर्चीवर बसलेली होती. त्या वेळी गाडीतून उतरलेल्या महिलेनं त्या महिला कर्मचाऱ्याचं तोंड पकडून तिला खुर्चीवरून खाली पाडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर कारमधून आलेल्या इतर काही जणांनी त्या महिलेला परत जाण्याविषयी सांगितलं. इतकं करून महिलेनं स्वतःच्या हातानं बॅरिकेड्स उघडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (17 जुलै) सकाळी 11 वाजता ही घटना घडली. सिकंदराबादच्या दिशेनं आलेल्या एका काळ्या रंगाच्या वेरना गाडीतून या व्यक्ती आल्या होत्या. गाडीचा क्रमांक 16 CY0061 असा होता. टोल नाक्यावर महिला कर्मचाऱ्यानं गाडी चालकाला ओळखपत्र दाखवायला सांगितलं. जवळच्या हृदयपूर गावातल्या कुलदीप नावाचा इसम त्या गाडीत होता. त्यानं ओळखपत्र दाखवण्यास नकार दिला. त्यानंतर त्याच्या बायकोनं महिला कर्मचाऱ्याला मारहाण केली. पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध तक्रार दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे; मात्र पोलिसांनी अजून अधिकृतरीत्या काहीही सांगितलेलं नाही.