समुद्रात पोहताना व्यक्तीवर शार्कचा हल्ला
नवी दिल्ली 10 जून : इजिप्तमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इजिप्तमधील हर्गहाडा येथील रेड सी रिसॉर्टमध्ये शार्कच्या हल्ल्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्ती रशियाचा नागरिक असल्याचं सांगण्यात येत आहे. इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने सांगितलं की, हर्गहाडा शहराजवळील एका रिसॉर्टमध्ये टायगर शार्कने रशियन माणसावर अचानक हल्ला केला. रशियन व्यक्तीने बरात वेळ शार्कचा हल्ला टाळण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला. पण तो सुटू शकला नाही. ही घटना गुरुवारची आहे. या भयानक दृश्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये संपूर्ण घटना स्पष्टपणे दिसत आहे. ती व्यक्ती स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पण टायगर शार्क पुन्हा पुन्हा त्याच्याभोवती फिरू लागतो आणि संधी मिळताच हल्ला करतो. शार्कने अनेकवेळा त्या व्यक्तीला पाण्याखाली ओढण्याचा प्रयत्न केला.
या घटनेदरम्यान एका लाइफगार्डने आरडाओरडा करून अनुचित घटनेचा इशारा दिला होता, त्यानंतर काही लोकही त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी गेले. मात्र, शार्कच्या हल्ल्यात रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तीचा मदत मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेनंतर अधिकाऱ्यांनी मधला 46 मैल म्हणजेच 74 किमी परिसर सध्या बंद केला आहे आणि रविवारपर्यंत तो बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.
मंत्रालयाने सांगितलं की, या व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या टायगर शार्कला पकडण्यात आलं आहे. आता या हल्ल्यामागे नेमकं कारण काय होतं, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वृत्तानुसार, घटना घडली तेव्हा त्या व्यक्तीचे वडीलही किनाऱ्यावर उपस्थित होते. हे भयानक दृश्य वडिलांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. तरी ते काही करू शकले नाहीत. शहरातील रशियन वाणिज्य दूतावासाने ठार झालेला व्यक्ती त्यांच्या देशाचा नागरिक असल्याचं सांगितलं आहे. व्लादिमीर पोपोव्ह असं या व्यक्तीचं नाव सांगितलं जात आहे. रशियाच्या ‘तास’ वृत्तसंस्थेनुसार, हा व्यक्ती 23 वर्षांचा होता. तो रशियन नागरिक होता, परंतु तो बऱ्याच काळापासून इजिप्तमध्ये राहत होता.