नवी दिल्ली, 4 मे : आई ही आईच असते. तिच्यासमोर, तिच्या प्रेमापुढे जगातील कोणतीही गोष्ट अगदी फिकीच वाटते. मग ही आई माणसाची असो की प्राण्याची. आपल्या मुलांसाठी आई कोणत्याही भयानक गोष्टीचा सामना करू शकते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक सिंह झेब्राच्या एका पिल्लावर हल्ला करतो, त्यानंतर त्या पिल्लाची आई थेट सिंहाशीच भिडते. या व्हिडीओमध्ये जंगलात एका सिंहाने झेब्राच्या पिल्लावर हल्ला केल्याचं दिसतंय. जंगलात झेब्रा पुढे येतो आणि त्याचं पिल्लू मागेच राहतं. तिच वेळ साधून, सिंह मागे राहिलेल्या झेब्राच्या पिल्लावर हल्ला करतो. सिंह मागून येऊन लहानशा झेब्राच्या पिल्लावर उडी मारतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. ते पिल्लू सिंहाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतं, परंतु सिंह त्या पिल्लाला सोडत नाही. सिंह त्या पिल्लाची मान पकडून त्याला खेचत घेऊन जात असतो.
त्याचवेळी पुढे गेलेला झेब्रा आपल्या पिल्लाला सिंहाच्या तावडीतून सोडवण्यासाठी येतो. सिंहाच्या जबड्यातून पिल्लाची मान सोडवण्यासाठी झेब्रा सिंहावर धावून जातो. परंतु सिंह पिल्लाला सोडत नाही. झेब्रा तरीही प्रयत्न सोडत नाही, तो सिंहाला चावण्याचा प्रयत्नही करतो. सिंह पिल्लाला जबड्यात पकडून इकडे-तिकडे फिरत राहतो.
शेवटी अनेक प्रयत्नांनंतर सिंह पिल्लाला सोडतो. याचवेळी सिंह झेब्रावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु झेब्रा मागच्या दोन पायांनी सिंहाच्या तोंडावर लाथ मारतो आणि स्वत:ची सुटका करुन घेतो. त्यानंतर झेब्रा आणि त्याचं पिल्लू तेथून पळ काढतात.
हा व्हिडीओ @animalworld111 नावाच्या एका ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.