व्हायरल व्हिडीओ
नवी दिल्ली, 18 जुलै: इंटरनेटवर विविध प्रकारच्या व्हिडिओ क्लिप व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ प्राण्यांशी संबंधित असतात. अस्वलाच्या बचावाची क्लिप असो, घरात घुसलेला साप असो किंवा इतर प्राण्यांची शिकार करणाऱ्या वन्यजीवांच्या क्लिप असो, अशा अनेक व्हिडिओंनी आतापर्यंत नेटिझन्सचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घनदाट झाडांमध्ये एक बिबट्या माकडाचा पाठलाग करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. “यामुळेच बिबट्या सर्वात संधीसाधू आणि अष्टपैलू शिकारी म्हणून ओळखले जातात,” अशा कॅप्शनसह नंदा यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या क्लिपमध्ये एक बिबट्या माकडाच्या मागे धावत असल्याचं दिसतं. तो झाडावर चढतो आणि माकडाच्या मागे उडी मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्याचे प्रयत्न फसतात. पण, तो बिबट्या पुन्हा प्रयत्न करतो आणि झाडावरुन उडी मारून माकडाला पकडतो.
ही पोस्ट दोन दिवसांपूर्वी शेअर करण्यात आली आहे. पोस्ट केल्यापासून हा व्हिडिओ तीन लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि ही संख्या अजूनही वाढत आहे. या क्लिपला चार हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. एका व्यक्तीनं कमेंट केली की, ‘बिबट्यामध्ये अविश्वसनीय ताकद असते आणि स्वतः अवाढव्य आणि अवजड असूनही ते तोंडात ताजी शिकार धरून आपल्या आवडत्या झाडावर 50 फूट (15 मीटर) उंचीपर्यंत चढू शकतात! बिबटे आपलं अन्न उंचावर ठेवतात त्यामुळे सिंह किंवा तरसासारखे इतर शिकारी प्राणी ते खाऊ शकत नाहीत.’ आणखी एका यूजरनं कमेंट केली की, “सर, तुमचे व्हिडिओ खरोखरच अतुल्य असतात कारण ते आम्हाला वन्यजीवांबद्दल महत्त्वाची माहिती देतात.” एका युजरनं कमेंट करून माहिती दिली की, ‘मांजर कुळातील मोठ्या प्राण्यांपैकी बिबटे सर्वात कार्यक्षम शिकारी आहेत. ते चपळ, कुशल आणि अत्यंत बलवान आहेत.’ “त्यांची शिकार कुठेही जाईल ते तिथपर्यंत पोहचू शकतात! किती सुंदर विकसित प्राणी आहे. माकड मात्र बिचारं,” अशी कमेंट आणखी एका युजरनं केली आहे.
बिबट्यानं माकडाची शिकार करणं, हा नैसर्गिक अन्नसाखळीचा नियमच आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. माणसानं वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांमध्ये अतिक्रमण केल्यानं वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. कधी-कधी हे प्राणी मानवांवर आणि पाळीव प्राण्यांवर हल्ले करतात. यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे हल्ले होण्याच्या घटना सर्वात जास्त घडतात.