सिंह पावसाचा आनंद घेताना व्हिडीओ
नवी दिल्ली, 24 जुलै : पावसाळा सुरु झाला असून देशभरात पावसानं हजेरी लावली आहे. लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि निसर्गरम्य वातावरण अनुभवण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी फिरायला जात आहेत. पर्यटकांचे आनंद लुटतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ जंगालाच्या राजाचा आहे. पावसाचा आनंद लुटताना त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. जंगलचा राजा सिंह पावसाचा आनंद लुटताना दिसला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ गुजरातमधील गीर जंगलांच्या बाजूला असलेल्या परिसरातील आहे. जिथे एक उड्डाणपूल असून सिंह यावर फिरत पावसाचा आनंद घेत होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सिंह एका ब्रिजवरुन पावसाचा आनंद घेत चालला आहे. रस्त्यावर गाड्या ये जा करत आहेत आणि सिंह एका बाजुने पावसात भिजत चालला आहे. हा व्हिडीओ @susantananda3 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 12 सेकंदांचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होताच एकच खळबळ उडाली.
जंगलातून प्राणी बाहेर येत असल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गुजरातमधील गीर जंगल आणि आजूबाजूचा परिसर एका संरक्षित क्षेत्राखाली येतो जिथे सिंहांशिवाय हरण, बिबट्या आणि इतर अनेक वन्यजीवांसाठी अभयारण्य आहे. कधी कधी भटकून गेल्यावर आजूबाजूच्या परिसरात वन्यप्राणी दिसतात. त्यामुळे मात्र रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहतो.