प्रतीकात्मक फोटो
बीजिंग, 27 एप्रिल : ‘सारी खुदाई एक तरफ, बीबी का भाई एक तरफ’, असं म्हटलं जातं. भारतात लग्ना त नवरीच्या भावाचंही खूप महत्त्वं आहे. काही विधी नवरीचा भाऊ करतो. तिला सख्खा भाऊ नसेल तर त्या विधी चुलत किंवा मानस भावाकडूनही करवून घेतल्या जातात. असं असताना आता तरुण अशी बायको शोधत आहेत, जिला भाऊ नाही. लग्नासाठी तरुण अशी अजब डिमांड करत आहेत, याचं कारणही शॉकिंग आहे. लग्न करताना तरुण-तरुणीच्या काही मागणी, अटी असतात. या अटी सामान्यपणे त्या व्यक्तीच्या दिसण्यासंबंधित किंवा शिक्षण, नोकरी अशा बाबतीत असतात. पण लग्नासाठी अशी मुलगी हवी जिला भाऊ नसावा, अशी मागणी करणाऱ्या पुरुषांची संख्या वाढते आहे. एका मॅचमेकिंग इवेन्टदरम्यान हा खुलासा झाला आहे.
चिनी मीडियानुसार, चीनमध्ये अशा अविवाहित पुरुषांची संख्या सातत्याने वाढत आहे, जे लहान भाऊ नसलेल्या जोडीदाराच्या शोधात आहेत. एप्रिलच्या सुरुवातीस पूर्व चीनमधील एका कार्यक्रमात 4,000 हून अधिक अविवाहित लोक सहभागी झाले होते. त्यांचे तपशील या कार्यक्रमात सादर करण्यात आले. त्यातील काही पुरुषांचा बायोडेटा पाहून सर्वांना धक्का बसला. या पुरुषांनी अशा वधूची मागणी केली जिला लहान भाऊ किंवा बहीण नाही. लग्नाची अजब प्रथा! लग्नातच नवरदेवाला उलटं लटकवून चप्पल-काठीने दिला जातो चोप; कारण… या कार्यक्रमात 1990 साली जन्मलेल्या शेंडोंग प्रांतातील एका तरुणाच्या बायोडेटानुसार, त्याला अशी गर्लफ्रेंड हवी, जिची एक स्थायी नोकरी आहे, जिच्याकडे कार आहे आणि तिचं कुटुंब आहे. तसंच तिला लहान भाऊ-बहीण नसावा असंही स्पष्टपणे सांगण्यात आलं. तर जिनानमध्ये 1998 मध्ये जन्मलेल्या एका पुरुषाने आपल्याला मृदू स्वभावाची आणि विचारशील बायको हवी आहे. तिला धाकटा भाऊ नसेल तर उत्तम असं म्हटलं. पुरुषांना भाऊ असलेल्या महिला नकोत, याची जाणीव महिलांनाही आहे. त्यामुळे काही महिलांनीही आपल्या बायोडेटामध्ये आपल्याला कुणीही लहान भाऊ-बहीण नाही असं नमूद केलं आहे. एका 27 वर्षीय महिलेच्या बायोडेटानुसार तिने आपल्याला एक लहान भाऊ आहे, पण तो एका उच्च विद्यापीठात विद्यार्थी आहे. तो वाचन आणि लेखनात खूप हुशार आहे आणि प्रगती करतो आहे. मला स्वतःला एक फू डि मो बनायचं नाही, असं तिने म्हटलं. काय आहे फू डि मो? ‘फू डि मो’ चीनमध्ये प्रचलित होत असलेला नवा शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ ‘लहान भावाला आधार देणारा’ असा होतो. हा शब्द अशा महिलांसाठी वापरला जातो ज्या आपल्या लहान भावासाठी खूप काही करतात. चीनमधील अनेक महिलांना त्यांच्या पालकांकडून त्यांच्या भावांना आर्थिक आधार देण्यास प्रवृत्त केलं जातं. PHOTO - एक विवाह ऐसा भी! थाटामाटात लागलं 2 झाडांचं लग्न; खास आहे कारण शानडोंग फ्यूचर सायकोलॉजी कन्सल्टिंग इन्स्टिट्यूटचे सल्लागार झांग फुहुई यांच्या मते, अनेक चिनी पालक आपल्या लहान भावांची जबाबदारी घेण्यासाठी आपल्या मुलींचं संगोपन करतात. लहानपणापासूनच पालक मुलींना समजावून सांगतात की मोठी बहीण म्हणून त्यांनी आपल्या लहान भावाला मदत करावी. परिणामी अनेक महिला आपल्या लहान भावांसाठी त्याग करतात. त्यामुळे पुरुषांना भीती वाटते की त्यांच्या बायका फक्त त्यांच्या धाकट्या भावासाठी योगदान देतील. या प्रकरणात ती तिच्या नवीन कुटुंबाच्या हिताकडे दुर्लक्ष करतील.