पावसाच्या पाण्यात डझनभर गॅस सिलेंडर गेले वाहून
नवी दिल्ली, 24 जुलै : पावसानं देशभरात हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे नागरिकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. अशातच एका ठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत डझनभर गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडलीय. याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओनं सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. पावसाच्या पाण्यात गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना गुजरातमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून गुजरातमध्ये धो धो पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे. पाणी साचल्याचे, रस्ते पाण्याखाली गेल्याचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर गराळा घालत आहे. यातच डधनभर गॅस सिलेंडर पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाही.
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका घराच्या छतावर डझनभर रिकामे आणि भरलेले सिलिंडर ठेवलेले दिसत आहेत. पुराचे पाणी त्या छतावरही भरते त्यामुळे रिकामे सिलिंडर पाण्यात तरंगू लागतात. हे सिलिंडर छताच्या शिडीजवळून बाहेर पडून रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात जाताना दिसतायेत. डझनभर गॅस सिलिंडर अशा प्रकारे वाहताना पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओ पाहून लोकांनी आधीच परिसर रिकामा केला असावा असा अंदाज आहे.
दरम्यान, गुजरातमधील सोमनाथ, जुनागड, राजकोट आणि नवसारी या जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे फटका बसला आहे. पूराच्या पाण्यात सर्वच गेलं असून नागरिकही चिंतेत आहेत.