व्हायरल
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी : आपण कुठे फिरायला जात असू तर प्रवास आपल्या मनासारखा आपल्याला हवा तसा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळे प्रत्येकजण कुठेही प्रवास करताना आपल्या आवडत्या वाहनांने किंवा फ्लाईटने जात असतात. यामध्येही ते आपली आवडती जागा आपली आवडती सीट बुक करतात. यासाठी अनेकवेळा ते जास्तीचे पैसैही देतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जास्तीचे पैसे देता आणि त्याऐवजी काहीतरी विचित्र मिळते तेव्हा तुमची प्रतिक्रिया कशी असेल? असाच काहीसा निराशजनक प्रकार एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनिरुद्ध मित्तल नावाच्या तरुणाने ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटमध्ये खिडकीच्या सीटसाठी जास्तीचे पैसे दिले. मात्र, त्याला याबदल्यात काय मिळाले याविषयी त्याने सोशल मीडियावर ट्विट करत सांगितलं आहे. अनिरुद्ध मित्तल यांनी ट्विटरवर ब्रिटिश एअरवेजच्या फ्लाइटमध्ये मिळालेल्या “विंडो” सीटचा फोटो शेअर केला आहे. खरं तर त्याच्या सीटला खिडकी नव्हती. लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरताना दृश्य पाहण्यासाठी जास्तीचे पैसे देऊनही त्यांच्यासोबत हा प्रकार घडल्याने ते चक्रावून गेले आणि त्यांनी पोस्ट शेअर करत त्यांचा संताप व्यक्त केला आहे.
अनिरुद्धने मिळालेल्या सीटचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिलं, “मी उजवीकडील विंडो सीटसाठी अतिरिक्त पैसे दिले कारण तुम्ही हिथ्रोवर उतरता तेव्हा दृश्य सुंदर असते.. @British_Airways माझी खिडकी कुठे आहे?” ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी पोस्टवर भरभरुन कमेंट करत आहे.
दरम्यान, विमानतळावर आणि विमानात अशा अनेक विचित्र घटना घडत असतात. यापूर्वीही सोशल मीडियावर अशा घटना समोर आल्या आहेत. याविषयी अनेक प्रवासी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असतात.