नवी दिल्ली 16 एप्रिल : तंत्रज्ञान आपल्याला आपल्या प्रियजनांशी आणि मित्रांशी संपर्कात आणि जोडून राहण्यास मदत करतं, परंतु कधीकधी ते आपल्यासाठी समस्याही निर्माण करतं. याचा दुष्परिणाम असाही होतो, की लोकांना ऑफिसमध्ये ओव्हरटाईम काम करावे लागतं आणि अनेक बॉस असं काम करून घेतात. याच्याशीच संबंधित एक प्रकरण नुकतंच चीनमधून समोर आलं आहे. ज्यात एका तरुणाला ओव्हरटाईम केल्यामुळे कंपनीचा राग आला होता. कंपनीने तिच्याकडून जबरदस्ती ओव्हारटाईम काम करून घेतलं, त्यानंतर तरुणीने थेट न्यायालयात धाव घेतली.
ही घटना चीनमधील एका आयटी कंपनीशी संबंधित आहे. टाईम्स यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, या कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला सतत ओव्हरटाईम करायला लावलं जात होतं. काम संपवूनही तिला मेसेज आणि इमेल्सच्या माध्यमातून ऑफिसचं काम करावं लागायचं. एका वर्षात दोन हजार तासांपेक्षा जास्त ओव्हरटाईम केल्याचा दावा केल्यानंतर ही मुलगी अचानक कोर्टात पोहोचली. सर्व कागदपत्रे तिने न्यायालयासमोर ठेवली. यानंतर न्यायालयाने महिला कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल देत मालकाला कामाच्या अतिरिक्त तासांची भरपाई देण्याचे निर्देश दिले. आयटी कंपनी या मुलीला तीस हजार युआन म्हणजेच सुमारे ३.५५ लाख रुपये देईल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. एका वर्षात तिने 2000 तासांपेक्षा जास्त काम केल्याचा दावा या तरुणीने केला होता. यातील बहुतांश वेळ मेसेजला रिप्लाय देण्यात गेला होता. कंपनीने लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, असंही न्यायालयाने आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. दुसऱ्या एका वृत्तानुसार, न्यायालयाने मुलीच्या बाजूने दिलेला निर्णय हा चीनमधील कामगार वर्गाचा मोठा विजय मानला जात आहे. विशेष म्हणजे चीनमध्ये कामगार कायद्यांचे क्वचितच पालन केले जाते आणि कर्मचारी शोषणाला बळी पडतात. त्यामुळेच हा निर्णय विशेष मानला जात आहे.