स्टंट व्हिडीओ
नवी दिल्ली, 01 जुलै: जगभरात अनेक ठिकाणी लोक प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात. बऱ्याचदा लोक आपल्या जीवाचाही विचार न करता स्टंटबाजी करताना दिसून येतात. सोशल मीडियावर तर एकापेक्षा एक खतरनाक स्टंट व्हायरल होत असतात. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच हटके शैलीत स्टंट करताना दिसतात. मात्र कधी कधी ही स्टंटबाजी अनेकांना महागात पडते. दिल्ली पोलिसांनी ट्विट करत स्टंट करण्यामध्ये किती रिस्क आहे याविषी सांगितलंय. दिल्ली पोलिसांनी 28 सेकंदांची ही क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये एक जोडपं बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा वेगात बाइक चालवत आहे आणि त्याच्या मागे एक मुलगी बसलेली आहे. तो गाडीचं पुढचं चाक वर करुन स्टंटबाजी करतोय. काही वेळातच त्या मुलाचा तोल जातो आणि त्यानंतर आधी मुलगी आणि नंतर मुलगा जमिनीवर पडतात. हा व्हिडीओ थराराक आहे.
दिल्ली पोलिसांनी हा व्हिडीओ शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओवर अनेक कमेंटही येताना दिसत आहे. असे स्टंट करणं धोक्याचं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. असे व्हिडिओ टाकून दिल्ली पोलीस आपली भूमिका मांडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही दिल्ली पोलिसांनी अनेक वेळा असे ट्विट केले आहेत
दरम्यान, सोशल मीडियावर स्टंटचे अनेक धोकादायक प्रकार समोर येतात. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत चालल्याचं पहायला मिळत आहे. प्रसिद्धीच्या नादात लोक आपल्याच जीवाशी अंगावर खेळ करतात. यापूर्वीही अनेक व्हिडीओ समोर आलेत ज्यामध्ये स्टंट करताना लोकांना दुखापत झाली आहे. त्यामुळे असे स्टंट करणाऱ्यावर पोलीस कारवाई करत आहे.