ब्रेकअपचं पत्र!
नवी दिल्ली, 28 मार्च : प्रेमामध्ये जेव्हा ब्रेकअप घेण्याची वेळ येते, तेव्हा अनेकदा जोडपं एकमेकांना भेटून त्यांच्यामध्ये चर्चा करून निर्णय घेतात. सोशल मीडियाच्या आजच्या काळातही सहसा कोणी स्वतःच्या ब्रेकअपबाबत सोशल मीडियावर माहिती देत नाही. पण एका तरुणानं ब्रेकअप घेताना असं काही केलं की त्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय. सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी सतत व्हायरल होत असतात. पण जेव्हा केव्हा एखादा तरुण त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप करण्याचा विचार करतो, तेव्हा तो सर्वांत प्रथम तिच्याशी बोलतो किंवा डायरेक्ट मेसेज करतो. त्यावर सोशल मीडियावर सहसा माहिती देणं टाळतो. मात्र एखाद्या तरुणानं कधी ऑफिशियल ब्रेकअप केलं असल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला एक असाच प्रकार सांगतोय, जो समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका तरुणानं त्याच्या प्रेयसीशी ब्रेकअप करण्यासाठी तिला एखाद्या कंपनीला पाठवतो तसं पत्र पाठवलं आहे. हा तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं संबंधित पत्र आणि प्रेयसीशी केलेलं चॅटिंग यांचे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केलेत. या तरुणाच नाव वेलिन असं असून, सध्या त्याने केलेलं ट्विट खूपच व्हायरल होत आहे.
वेलिनने त्याच्या प्रेयसीला लिहिलेलं पत्र ट्विटर शेअर केलं आहे. ज्यात लिहिलं आहे की, ‘मला आशा आहे की तुला हे पत्र नक्की मिळेल. मला आपल्या नात्यात निर्माण झालेल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. मला आताच अशा गोष्टीची माहिती मिळाली आहे, ज्याने मला हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. आपल्या नातेसंबंधांबाबात पुनर्विचार करावा लावला आहे. मला तुला कळवण्यास वाईट वाटतं की, मी आपलं नातं पुढं सुरू ठेवू शकत नाही.’ ही पोस्ट पाहिल्यानंतर त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे. अनेकांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट केल्यात.
नेमका काय आहे प्रकार? वेलिन आणि त्याच्या प्रेयसीचं नातं अशा टप्प्यावर पोहोचलं, जिथे दोघांमध्ये समेट होणं शक्य नव्हतं, त्यामुळेच दोघांमध्ये ब्रेकअप झालं. पण ब्रेकअप घेताना वेलिनने त्याच्या मैत्रिणीला स्वाक्षरी करण्यासाठी आणि अधिकृतपणे वेगळे होण्याचा पुरावा म्हणून एक पत्र पाठवलं. विशेष म्हणजे, यासंबंधी तो त्याच्या प्रेयसीशी व्हॉट्सअॅपवर जे बोलला, त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा त्यानं ट्विटरवर शेअर केलाय. या स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे की, जेव्हा वेलिनच्या प्रेयसीला त्याने पाठवलेलं पत्र मिळालं तेव्हा तिनं फक्त “व्वा” असं उत्तर दिलं. त्यानंतर त्याने तिला पत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं, ज्यामुळे ती गोंधळली होती. दरम्यान, ब्रेकअप घेण्यासाठी कोण काय करेल, याचा काही नियम राहिला नाही. त्याचेच हे उत्तर उदाहरण आहे.