महिलेच्या बॅगेत आढळले साप
नवी दिल्ली 01 मे : जगभरात तस्करीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सोने-चांदी आणि अमली पदार्थांनंतर आता लोक काही दुर्मिळ प्राण्यांची तस्करी करताना दिसतात. नुकतंच चेन्नई विमानतळावरून असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मलेशियाहून चेन्नई विमानतळावर पोहोचलेली एका महिला प्रवाशी संशयास्पद वाटल्यानंतर तिच्या बॅगची झडती घेतली. यावेळी बॅगेत 22 जिवंत साप आढळले.
एकीकडे साप विषारी असल्याने बहुतेक लोक त्यांच्यापासून अंतर राखतात. त्याचवेळी, त्यांच्या विशेष विषामुळेच ते अनेक ठिकाणी खरेदी केले जातात आणि विकले जातात. यासोबतच आजकाल काही लोक अजगराला पाळीव प्राणी म्हणून पाळताना दिसतात. सध्या चेन्नई विमानतळावरुन अशीच एक घटना समोर आले. इथे पोहोचल्यावर महिलेच्या सामानाची तपासणी सुरू असताना बॅगेतून साप बाहेर येऊ लागल्याने कस्टम विभागाचं पथक आश्चर्यचकित झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व साप वेगवेगळ्या प्रजातीचे असून, ते वेगवेगळ्या प्लास्टिकच्या डब्यात आणले होते. कस्टमने दिलेल्या माहितीत असं सांगण्यात आलं की, ही महिला मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून 28 एप्रिल रोजी फ्लाइट क्रमांक एके 13 मधून भारतातील चेन्नई विमानतळावर उतरली होती. पिशवीतून साप बाहेर येतानाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून युजर्सची चांगलीच दमछाक झाली आणि तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ANI या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून सीमा शुल्क विभागाच्या पथकाने सीमा शुल्क कायदा 1962 आणि वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत बॅगांच्या तपासणीदरम्यान सापडलेल्या 22 जिवंत साप जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच महिलेला अटक केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओ पाहून यूजर्सलाही घाम फुटला आहे.