व्हायरल
नवी दिल्ली, 13 मार्च : आजकाल स्वतःला आजारापासून दूर ठेवण्यासाठी आणि उत्तम, निरोगी आरोग्यासाठी प्रत्येकजण काहीना काही करत असतात. मग लोक जीम असेल, योगा असेल किंवा हेल्दी फूड असेल याचा आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करतात. वाढत्या वयानुसार लोकांमध्ये थकवा येऊ लागतो, पाय दुखणे, पाठीचा त्रास, अशा बऱ्याच समस्या उद्भवतात. मात्र सध्या एका आजीचा व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत असून तिचा फीटनेस पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. सध्या फिटनेस फ्रीक आजीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 103 व्या वर्षीही ती रोज जिममध्ये जाते. सध्या तिचा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून वाऱ्यासारखा सोशल मीडियावर फिरतोय.
कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या टेरेसा मूरची ही कहानी आहे. वयाच्या 103 व्या वर्षी आजी आठवड्यातून चार ते पाच दिवस जिमला जातात. इतकंच नाही तर ती बहुतेक वेळा मेकअप करूनच येते. ती मशिनने व्यायाम करते. तिच्या चेहऱ्यावरील तेज पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की ती 103 वर्षांची आहे. तिचा जीममधील फोटो समोर आला आहे.
@Pubity नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा आजीचा जीममधील फोटो शेअर करण्यात आला आहे. अगदी काही वेळात हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओवर अनेक कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव होत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, तेरेसा यांचा जन्म इटलीमध्ये झाला. 1946 मध्ये तिने एका आर्मी ऑफिसरशी लग्न केले. तेव्हापासून ती जगातील अनेक देशांमध्ये राहिली आहे. टेरेसा म्हणते की व्यायामामुळे तिला ऊर्जा मिळते, परंतु तिच्या मुलीचा असा विश्वास आहे की तिच्या आईचा साहसी स्वभाव तिला जिममध्ये घेऊन जातो. मुलगी शीला मूर म्हणाली, मला वाटते आई एक जिज्ञासू व्यक्ती आहे. ती जिममध्ये जाते आणि मित्रांना भेटते. त्यांना आनंद वाटतो. व्यायामाव्यतिरिक्त ब्रिज खेळणे आणि ऑपेराला जाणे हे तेरेसाचे आवडते छंद आहेत.