केनिया रोड अपघात
नवी दिल्ली, 01 जुलै : गेल्या काही दिवसांपासून अनेक भयानक अपघाताच्या घटना समोर येत आहे. एका पेक्षा एक हादरवणारे अपघात होत आहेत. आता केनियातही भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. पश्चिम केनियामध्ये शुक्रवारी ट्रकचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे. ट्रकने इतर वाहने आणि पादचाऱ्यांनाही धडक दिली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लोंडियानी जंक्शन येथे हा अपघात झाला. रस्त्यावर अनेक मिनीबस आणि उलटलेल्या ट्रकचे भयानक दृश्य समोर येत आहेत. रिफ्ट व्हॅलीचे प्रादेशिक पोलिस कमांडर टॉम मोबोया ओडेरो यांनी सांगितले की, केरिचोच्या दिशेने निघालेल्या ट्रकचे नियंत्रण सुटले आणि आठ वाहने, अनेक मोटारसायकल, रस्त्याच्या कडेला असलेले विक्रेते आणि इतर व्यवसायातील लोकांना धडक दिली.
केनिया पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. जखमींची संख्या अधिक असू शकते. ढिगाऱ्यात काही जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकर्ते पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, ही घटना खूपच भयानक आहे. अचानक अपघात झाल्याने लोक सर्वत्र ओरडत धावत होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत.