लंडन, 23 एप्रिल : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी (Queen Elizabeth II) 21 एप्रिल 2021 रोजी वयाची 95 वर्षं पूर्ण केली. यंदाचा त्यांचा वाढदिवस त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलिप (Duke of Edinburgh, Prince Philip) यांच्या मृत्यूमुळे झाकोळला गेला. प्रिन्स फिलिप यांचं त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या केवळ काही आठवडे आधी निधन झालं. महाराणी एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी झाला. त्यामुळे 21 एप्रिल रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांचा आणखी एक वाढदिवस असतो, तो जून महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी. हा ऑफिशियल वाढदिवस म्हणून ओळखला जातो. एलिझाबेथ राणी त्यांचा वाढदिवस 21 एप्रिल रोजी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत साजरा करतात. 21 एप्रिल रोजी त्यांना हाइड पार्कमध्ये 41 बंदुकांच्या फैरींची, विंडसर ग्रेट पार्कमध्ये 21 बंदुकांच्या फैरींची आणि टॉवर ऑफ लंडन येथे 62 बंदुकांच्या फैरींची मानवंदना दिली जाते. त्यांच्या ऑफिशियल वाढदिवशी, म्हणजेच जूनच्या दुसऱ्या शनिवारी देशभरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी ट्रूपिंग ऑफ कलर्स परेड (Trooping of Colours Parade) हा पारंपरिक सोहळा असतो. हा सोहळा 260 हून अधिक वर्षं साजरा केला जात आहे. कारण तो ब्रिटिशांच्या आतापर्यंतच्या सर्व सम्राटांचा ऑफिशियल वाढदिवस (Official Birthday of Royal Monarch) म्हणून साजरा केला जातो.
ट्रूपिंग ऑफ कलर्स या परेडमध्ये 1400हून अधिक जवान, 200 घोडे आणि 400 म्युझिशियन्सचा समावेश असतो. बकिंगहॅम पॅलेस (Buckingham Palace) या एलिझाबेथ यांच्या अधिकृत निवासस्थानापासून ही परेड सुरू होते. ही परेड मॉलकडून जाते, नंतर डाउनिंग स्ट्रीटजवळच्या व्हाइट हॉल येथे हॉर्स गार्डस् परेड होते आणि तिथून ती परेड परत मूळ स्थानी येते. त्यानंतर पारंपरिक सोहळ्याचा भाग म्हणून राजघराण्यातले सदस्य मॉलमध्ये जातात आणि बकिंगहॅम पॅलेसच्या बाल्कनीतून लोकांना शुभेच्छा देतात, त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतात. त्यानंतर रॉयल एअर फोर्सची विमानं हवाई कसरती सादर करतात आणि हा सोहळा संपन्न होतो. उन्हाळ्यातल्या या दिवशी वातावरण सुखद असतं. त्यामुळे त्या दिवशी राजघराण्यातल्या सम्राटांचा ऑफिशियल वाढदिवस सार्वजनिकरित्या साजरा करण्याची ही परंपरा पडली. किंग जॉर्ज द्वितीय (King George II) यांनी ही परंपरा सुरू केल्याचं मानलं जातं. त्याचा स्वतःचा जन्म ऑक्टोबरमध्ये झाला होता.
यंदा 21 एप्रिलला एलिझाबेथ यांच्या वाढदिवशी बंदुकांच्या फैरींची मानवंदना देण्यात आली नाही. कारण ड्यूक ऑफ एडिनबरा प्रिन्स फिलिप यांच्या मृत्यूचा दुखवटा सुरू आहे. तसंच, त्यांच्या वाढदिवसासह अन्य महत्त्वाच्या प्रसंगी त्यांचं ऑफिशियल पोर्ट्रेट प्रसिद्ध केलं जातं, तेही यंदाच्या वाढदिवशी प्रसिद्ध करण्यात आलं नाही.