Tourism Places in Agra: फक्त ताजमहालच नाही आग्र्यातील ‘ही’ ठिकाणंही घालतात पर्यटकांना भुरळ, पाहा सुंदर पर्यटनस्थळांची यादी
आग्रा, 14 सप्टेंबर: जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालाला (Taj Mahal) भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं भेट देतात. ताजमहाल त्याच्या सौंदर्यासाठी जगप्रसिद्ध आहे. आग्रा म्हटलं की ताजमहल हे एक समीकरणचं झालंय. आग्र्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची पावलं सर्वांत आधी ताजमहालकडे वळतात. पण ताजमहालशिवाय आग्र्यात भेटी देण्यासारखी ऐतिहासिक महत्त्व असलेली अनेक ठिकाणं आहेत. ताजमहालाचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी जर आग्र्यात जात असाल तर इतर ठिकाणंही आवर्जून पाहायला हवीत. अशाच ऐतिहासिक ठिकाणांची माहिती (Tourism Places in Agra) घेण्याचा प्रयत्न करूयात. 1. आग्र्याचा पंचमहल आग्रा इथं पंचमहल (Panch Mahal) म्हणजेच पाच मजल्यांचा महाल आहे. फतेहपूर सिकरीच्या पश्चिम कोपऱ्यात ही वास्तू आहे. मुघल सम्राट अबकरने त्याच्या राण्यांसाठी याची निर्मिती केली होती. या वास्तूचं वैशिष्ट्य म्हणजे इथं 176 खांब आहेत. या खांबांमधून वाहणारी हवा थंड असल्याचा अनुभव येणाऱ्या पर्यटकांना येतो. 2. अंगुरी बाग अन् शाही स्नानासाठी हमाम पर्यटनासाठी आग्रा इथं गेल्यानंतर अंगुरी बागला आवर्जून भेट द्यायला हवी. सन 1637 मध्ये शाहजहानने (Shah Jahan) याची निर्मिती केली. त्याच्या राण्यांना आराम मिळावा व स्नान करण्यासाठी उत्तम जागा असावी म्हणून अंगुरी बाग बनवण्यात आली. शाही स्नानासाठी इथं हमाम बनवले गेले. यासोबतच या ठिकाणी द्राक्षांची मोठी बाग आहे. **हेही वाचा:** Pet Care Tips: प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांनाही सोबत घ्यायचंय? ‘या’ मार्गांचा करा वापर 3. सूर सरोवर पक्षी अभयारण्य आग्र्यामध्ये सूर सरोवर पक्षी अभयारण्य आहे. इथं गोड्या पाण्याचं अप्रतिम सरोवर आहे. यात बोटिंगचा आनंद लुटण्यासह विविध प्रकारच्या पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येऊ शकतो. पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकारांनी भेट देण्यासाठी हे ठिकाण खूप उत्तम आहे. 4. आग्र्याचा किल्ला आग्रा इथं पोहोचल्यानंतर ताजमहालाला भेट दिल्यानंतर तुम्ही आग्र्याच्या किल्ला पाहायलाच हवा. बलुआ प्रकारातील दगडांपासून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे. मुघल सम्राट अकबराने सन 1654 मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली होती. लाल किल्ल्याशी सुसंगत असा हा किल्ला आहे. सकाळी किल्ला पाहायला सुरुवात केल्यानंतर तो पूर्ण पाहण्यासाठी सायंकाळपर्यंतचा वेळ लागतो.
फक्त ताजमहालच नाही आग्र्यातील ‘ही’ ठिकाणंही घालतात पर्यटकांना भुरळ, वाचा यादी ऐतिहासिक पर्यटनाच्या दृष्टीनं भारतात असंख्य वास्तू पाहायला मिळतात. आग्रा व दिल्ली इथं तर देश-विदेशातून वर्षातील बाराही महिने पर्यटकांचा कायम ओघ असतो. ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यांत नोंदलेलं ठिकाण असल्यानं सहाजिकच इथं येणारे पर्यटक सर्वाधिक आहेत. पण त्याचवेळी शहरातील व त्याच्याजवळील ऐतिहासिक वास्तूंना पर्यटकांनी भेट दिली तर पर्यटनवृद्धी तर होईलच पण देशाचा ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यास मदतही होऊ शकेल. त्यामुळे या ठिकाणांना नक्की भेट द्यायला हवी.