नवी दिल्ली, 24 मे : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, गेल्या आठवड्यात व्हॉट्सअॅपला (WhatsApp) आपली नवी प्रायव्हसी पॉलिसी परत घेण्याचे आदेश दिले होते. यापूर्वी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपच्या नव्या अटींमुळे आयटी कायद्यांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. परंतु व्हॉट्सअॅपने केंद्र सरकारला नवीन प्रायव्हसी पॉलिसी त्यांच्या अनुरुप असल्याचं उत्तर दिलं होतं. WhatsApp ने त्यांची नवी प्रायव्हसी पॉलिसी (WhatsApp Privacy Policy) स्वीकारण्यासाठी युजर्सला 15 मेपर्यंतचा वेळ दिला होता. जे युजर्स पॉलिसी स्वीकारणार नाही, त्यांना व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स हळू-हळू वापरता येणार नाहीत, असं सांगिण्यात आलं होतं. अद्यापही अनेक व्हॉट्सअॅप युजर्सनी प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारलेली नाही आणि त्यांना आता काही फीचर्सही वापरता येत नसल्याच्या अनेक बाबी समोर आल्या आहेत. काही ट्विटर युजर्सनी, सोमवारी याबाबत ट्विट केलं आहे. व्हॉट्सअॅप प्रायव्हसी पॉलिसी स्वीकारली नसल्याने व्हॉट्सअॅप, ऑडिओ-व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी देत नसल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तर काही युजर्सनी पॉलिसी स्वीकारली नसल्याने केवळ ऑडिओ कॉलिंग फीचर सुरू आहे, असं म्हटलं आहे. तसंच ज्यांनी पॉलिसी स्वीकारली नाही, त्या सर्वांसाठीच हे फीचर बंद झालं नसलं, तरी काहींसाठी फीचर बंद झालं असल्याची बाब समोर आली आहे.
अकाउंट डिलीट होणार नाही - व्हॉट्सअॅपने सर्वात आधी युजर्सनी अटी 15 मेपर्यंत मान्य न केल्यास व्हॉट्सअॅप अकाउंट डिलीट होण्याबाबत सांगितलं होतं. मात्र नंतर काही दिवसांनी अकाउंट डिलीट होणार नसल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. ज्या युजर्सनी पॉलिसी अॅक्सेप्ट केली नाही, त्या युजर्सला पॉलिसी अॅक्सेप्ट करण्यासाठी व्हॉट्सअॅप पॉप-अप पाठवत राहिल असं सांगण्यात आलं आहे. अकाउंट डिलीट झालं नाही, तरी युजर्स काही दिवसांनी काही फीचर्स वापरु शकणार नाही, असंही कंपनीने सांगितलं होतं.
मर्यादित कालावधीत अटी मान्य न केल्यास, युजर्स त्यांची चॅट लिस्ट अॅक्सेस करू शकणार नाहीत. त्यांना इतर युजर्सकडून चॅट रिसिव्ह होतील, परंतु केवळ नोटिफिकेशनद्वारे ते वाचता येईल किंवा नोटिफिकेशनद्वारेच रिप्लाय करता येईल. WhatsApp काही आठवड्यांपर्यंत युजर्सला अटी मान्य करण्यासाठी रिमाइंडर पाठवत राहील, असंही सांगण्यात आलं आहे.