मुंबई 12 डिसेंबर : ‘ट्विटर ब्लू’ ही ट्विटरची सबस्क्रिप्शन सर्व्हिस आज (12 डिसेंबर) रीलाँच होणार आहे. कंपनीने ऑफिशियल ट्वीटद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. सबस्क्रिप्शन सर्व्हिस अंतर्गत युझर्सना ब्लू टिक, 1080p व्हिडिओ पोस्टिंग आणि ट्वीट एडिट करण्यासारखी प्रीमियम फीचर्स मिळतील. Apple IOS युझर्ससाठी ही सेवा महाग असणार आहे. या सेवेसाठी ट्विटरच्या वेब युझर्सना दरमहा $8 मोजावे लागतील, तर iOS युझर्ससाठी हे शुल्क $11 प्रति महिना ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती कंपनीने ट्वीटमधून दिली आहे. या संदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे. या वेळी ट्विटरद्वारे युझर्सच्या अकाउंट्सचं अधिक सखोल पुनरावलोकन केलं जाईल. केवळ व्हेरिफाइड फोन नंबर असलेल्या युझर्सना ही सेवा मिळेल. यासाठी ट्विटरचे कर्मचारी स्वत:ही अकाउंटचे पुनरावलोकन करतील. ट्विटरचे प्रॉडक्ट मॅनेजर एस्थर क्रॉफर्ड यांच्या मते, “कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला तोंड देण्यासाठी आम्ही काही नवीन पावलं उचलली आहेत. जे ट्विटरच्या नियमांच्या विरोधात आहे, त्यावर कारवाई होईल. कोणत्याही युझरला ब्लू टिक देण्याआधी, त्याच्या अकाउंटची पूर्ण पडताळणी केली जाईल.” ट्विटर चालत नसेल तर नेटवर्क कंपनीवर काढू नका राग; हे आहे मुख्य कारण व्हेरिफिकेशननंतर युझर्सना ब्लू टिक दिली जाईल. यासोबतच युझर्सना त्यांच्या ट्विटमधला कंटेंट एडिट करण्याचा अधिकारही मिळणार आहे. युझर्स ट्वीट केल्यानंतर 30 मिनिटांच्या आत कंटेंट एडिट करू शकतील. याशिवाय, तुम्ही 1080p व्हिडिओदेखील अपलोड करू शकतात. यासोबतच मोठी ट्वीट्सही करता येतील. सबस्क्रिप्शन घेणाऱ्या युझर्सच्या ट्वीट्सना प्राधान्य मिळेल आणि त्यांना इतर युझर्सच्या तुलनेत 50 टक्के कमी जाहिराती दिसतील. विशेष म्हणजे, युझर्सनी त्यांच्या प्रोफाइलवरचा फोटो किंवा नाव बदललं तर त्यांची ब्लू टिक काढून टाकली जाईल आणि पुन्हा पडताळणी केल्यानंतर पुन्हा ब्लू टिक दिली जाईल. कोणत्याही विशिष्ट मोहिमेच्या निषेधार्थ त्यांचे प्रोफाइल फोटो आणि नावं बदलणार्या युझर्सवर कारवाई करण्यासाठी कंपनीने हे फीचर सुरू केलं आहे, असं म्हटलं जातंय. खुशखबर! Twitter वर आले नवीन फीचर, तुम्ही ‘लाइव्ह ट्विटिंग’ करून पाहिलंय का? कसे वापरायचे? “युझर्स त्यांचं हँडल, डिस्प्ले नाव किंवा प्रोफाइल फोटो बदलू शकतील. परंतु त्यांनी तसं केल्यास त्यांची ब्लू टिक तात्पुरती काढून टाकली जाईल आणि त्यांच्या अकाउंटची पुन्हा पडताळणी केली जाईल,” असं अधिकृत ट्विटर अकाउंटवरून सांगण्यात आलं आहे. अलीकडेच ट्विटरचा ताबा टेस्लाचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी घेतला होता. तेव्हापासून ते याबाबत सातत्याने प्रयोग करत आहेत. कंपनीने ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन फी $8 ठेवली आहे; मात्र अनेक बनावट अकाउंट असलेल्यांनी ही फी भरली होती. त्यामुळे त्यांनाही ब्लू टिक्स मिळाल्या होत्या. त्यामुळे त्या फेक अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्वीट्सना कंपनीचं ट्वीट मानलं गेलं आणि त्यामुळे अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे कंपनीला ब्लू सबस्क्रिप्शन फीचर बंद करावं लागलं; मात्र आता ते नव्या पद्धतीने सुरू करण्यात येत आहे.