नवी दिल्ली, 26 डिसेंबर : शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकने (TikTok) 2021 मध्ये मोस्ट पॉप्युलर डोमेनमध्ये Google लाही मागे टाकलं आहे. वेब सिक्युरिटी कंपनी क्लाउडफ्लेयरने वर्षभरातील डेटा एनालिसिसनंतर एक लिस्ट तयार केली आहे. त्यानुसार, गुगलसह जगातील 9 मोठ्या कंपन्या TikTok हून मागे आहेत. 2020 मध्ये फेसबुकनंतर गुगल सर्वात पॉप्युलर डोमेन होतं, तर TikTok सातव्या रँकवर होतं. आता मात्र यात लिस्टमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतात मागील वर्षी टिकटॉकसह अनेक चायनीज Apps सुरक्षेच्यादृष्टीने बॅन करण्यात आले होते. सरकारच्या बॅननंतर गुगलने टिकटॉकसह सर्व बॅन केलेले Apps प्ले स्टोरवरुन हटवले होते. TikTok सह अनेक चायनीज Apps Apple Store वरही उपलब्ध नाहीत. परंतु तरीही TikTok App भारतात अनेक जण अॅक्सेस करत आहेत.
क्लाउडफ्लेयरच्या रिपोर्टनुसार, 17 फेब्रुवारी 2021 ला टिकटॉक एका दिवसासाठी टॉपवर होतं. त्यानंतर मार्च आणि मे मध्येही टिकटॉक टॉप लिस्टमध्ये होतं. परंतु 10 ऑगस्ट 2021 नंतर टिकटॉक सतत वरच्या क्रमांकावर आहे. भारतात टिकटॉक बॅन असूनही महिन्याला 1 बिलियन अॅक्टिव्ह युजर्स असण्याचा दावा करण्यात आला आहे. सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या वेबसाइटमध्ये, सर्वात पहिल्या क्रमांकावर TikTok असून Google सर्वाधिक पाहिली गेलेली दुसरी वेबासाइट आहे.
2021 मध्ये गुगलनंतर तिसऱ्या क्रमांकावर Facebook, त्यानंतर Microsoft, पाचव्या क्रमांकावर Apple आणि सहाव्या क्रमांकावर ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सामिल आहे. व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix या लिस्टमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. Google व्हिडीओ प्लॅटफॉर्म YouTube आठव्या स्थानावर आहे. त्यानंतर 9व्या क्रमांकावर Twitter आणि इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp दहाव्या क्रमांकावर आहे.