नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. प्रत्येक वर-वधू लग्नाचे हे क्षण खास करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. कोणी थीम बेस्ड लग्न करतं, कोणी रथ घेऊन येतं, तर कोणी बुलेटवर वधूला घेण्यासाठी येतो. आता या सर्वांपुढे जात लग्नात हेलिकॉप्टरचाही वापर होतो. पण यासाठी मोठी किंमत द्यावी लागते. पण आता बिहारच्या एका व्यक्तीने असं हेलिकॉप्टर बनवलं आहे, ज्याचं भाडं तुलनेने कमी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे त्याने हे हेलिकॉप्टर टाटा कंपनीच्या नॅनो कारला (Tata Nano) आकार देत हेलिकॉप्टर बनवलं आहे. लग्नसमारंभात याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सोशल मीडियावरही याचे फोटो व्हायरल होत आहेत. याच्या मागच्या भागात पंख लावलेले दिसतात. पण हे सामान्य हेलिकॉप्टर प्रमाणे उडू शकत नाही. सेंसरच्या वापराने केला कारनामा, आतापर्यंत 19 बुकिंग - नॅनो कारचं रुपांतर हेलिकॉप्टरमध्ये करणारा व्यक्ती गुड्डू शर्मा बिहारच्या बगहा येथील रहिवासी आहे. त्याने 2 लाख रुपये खर्च करुन नॅनो कारला हेलिकॉप्टर (Tata Nano Modified As Helicopter) बनवलं. गुड्डूने सेंसरचा वापर करुन हे बदल केले आहेत. अनेक लोक हे हेलिकॉप्टर लग्नसमारंभात वापरत आहेत. आतापर्यंत 19 लोकांनी यासाठी बुकिंग केलं आहे. याचं भाडं 15000 रुपये आहे. गुड्डूने दिलेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर बनवण्यासाठी दीड लाखाहून अधिक खर्च येतो. तसंच याला हायटेक लूक देण्यासाठी 2 लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. सध्या यावर काम सुरू आहे.
अशी सुचली कल्पना - लग्नात हेलिकॉप्टर बुकिंगबाबत अनेकांमध्ये उत्साह असतो. याची मोठी मागणी असते. परंतु अनेक लोक इच्छा असूनही अधिक भाडं असल्याने लग्नात हेलिकॉप्टरमधून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे मी माझ्या टाटा नॅनो कारला मॉडिफाय केलं आणि हेलिकॉप्टरचं डिझाइन दिलं, जेणेकरुन लोक कमी खर्चात आपली इच्छा पूर्ण करू शकतील, असं गुड्डू यांनी सांगितलं.
गुड्डू यांनी बनवलेल्या या हेलिकॉप्टर आधी बिहारमधील छपरा जिल्ह्यात राहणाऱ्या मिथिलेश यांनीही टाटा नॅनो कारचं हेलिकॉप्टर तयार केलं होतं. त्यांनी हे सात महिन्यात तयार केलं होतं. त्यांनी हे केवळ मॉडिफाय केलं होतं. यासाठी त्यांना 7 लाख रुपये खर्च आला होता.