नवी दिल्ली, 10 मे : कोरोना संक्रमित (Coronavirus) रुग्णांना सध्या जितकी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तितकीच गरज प्लाझ्मा (Plasma) डोनर्सचीही (Plasma Donors) आहे. सोशल मीडियावर अनेक जण प्लाझ्मा डोनर्स मिळण्याबाबत पोस्ट करत असतात. हीच समस्या दूर करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट स्नॅपडीलने (Snapdeal) एक असं अॅप लाँच केलं आहे, जे प्लाझ्मा डोनर्स आणि गरजूंना या कठीण काळात मदत करू शकेल. स्नॅपडीलने या अॅपला संजीवनी (Sanjeevani) असं नाव दिलं आहे. हे अॅप याआधीचं लाँच केलं होतं, परंतु हे आधी केवळ त्यांच्याच कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित होतं. परंतु आता कंपनीने हे अॅप सर्वांसाठी ओपन केलं आहे. या अॅपद्वारे कोरोना रुग्णांसाठी सहजपणे प्लाझ्मा डोनर्स शोधण्यास मदत होणार आहे.
कसा करता येईल वापर - स्नॅपडीलने आपलं ईझी टू यूज संजीवनी (Snapdeal Sanjeevani) नावाचा प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. यामाध्यमातून छोट्या शहरातील लोकही या सुविधेचा लाभ घेण्यास सक्षम असतील. हे टूल वेबसाईट आणि मोबाईल अॅपद्वारेही वापरता येऊ शकतं. या प्लॅटफॉर्मवर पेशन्ट आणि डोनर आपल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे रजिस्ट्रेशन करू शकतात. दोघांना आपला ब्लड ग्रुप, लोकेशन, कोरोना टेस्ट रिपोर्ट, टेस्ट कधी झाली याबाबतची माहिती भरावी लागेल.
रजिस्ट्रेशननंतर स्नॅपडीलचं सर्च इंजिन योग्य तो मॅच निवडेल, आणि पेशन्ट आणि संबंधित प्लाझ्मा डोनरमध्ये संपर्क साधून देईल. दरम्यान, फेसबुक, गुगल, HealthifyMe यासारख्या अनेक कंपन्या आणि स्टार्टअप्सनी गेल्या काही काळात कोरोना-19 लसीकरणाबाबत मदतीसाठी अनेक टूल लाँच केले आहेत. देशात टेक्नोलॉजीचा वाढता वापर आणि सोशल मीडिया साईट्सचे वाढते युजर्स पाहता देशातील अनेक कंपन्या आणि डेव्हलपर्स कोरोनाचा लढा देण्यासाठी रुग्णालयं, बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांसारख्या सोयी उपलब्ध करण्यासाठी विविध टूल लाँच करत आहे.