नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर : मागील काही दिवसांपूर्वी OnePlus स्मार्टफोनमध्ये अचानक झालेल्या स्फोटामुळे चर्चेत होता. आता पुन्हा एकदा अशाच प्रकाराने फोनची मोठी चर्चा आहे. OnePlus Nord 2 एखाद्या बॉम्बप्रमाणे फुटल्याची घटना नुकतीच घडली आहे. महाराष्ट्रातील धुळ्यात एका व्यक्तीसोबत हा भयंकर प्रकार घडला. या व्यक्तीने ट्विटरवर ब्लास्टचे काही फोटो शेअर केले आहेत. सुहित शर्मा नावाच्या धुळ्यातील एका व्यक्तीच्या खिशातच स्मार्टफोनचा स्फोट झाला. याचे गंभीर परिणाम झाले असून व्यक्तीने ट्विट करत कंपनीविरोधात संताप व्यक्त केला आहे.
सुहित शर्मा यांनी चार फोटो ट्विट केले आहेत. ट्विट करत त्यांनी, OnePlus कडून अशी अपेक्षा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कंपनीकडे तक्रार करत त्यांनी तुमच्या प्रोडक्टमुळे मुलाची काय गंभीर परिस्थिती झाली आहे पाहा. परिणामांसाठी तयार राहा. लोकांच्या आयुष्याशी खेळणं बंद करा…तुमच्यामुळे मुलगा मोठ्या समस्येत आहे…लवकरात लवकर संपर्क करण्याचं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
व्यक्तीने शेअर केलेल्या फोटोमध्ये फोन जळल्याचं दिसतंय. फोन खालच्या बाजूने पूर्णपणे फुटला आहे. फोनचा ब्लास्ट झाला त्यावेळी OnePlus Nord 2 पीडित व्यक्तीच्या खिशात होता. अशात अचानक स्फोट झाल्याने त्या व्यक्तीच्या मांडीला अतिशय गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याभागातील संपूर्ण त्वचा निघाली आहे.
या घटनेनंतर वनप्लसनेही त्वरित प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही अशा घटना अतिशय गंभीरपणे पाहातो. आमची टीम युजरपर्यंत पोहोचली आहे आणि पुढील तपासासाठी डिटेल्स जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’ असं कंपनीने म्हटलं असून अद्याप फोनमध्ये ब्लास्ट होण्यामागच्या कारणाचा खुलासा झालेला नाही.