नवी दिल्ली, 23 जून : मागील वर्षी 2020 मध्ये जगभरात कोरोनामुळे (Coronavirus) लॉकडाउनमध्ये (Lockdown) ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करणं हाच पर्याय होता. यादरम्यान मोबाईल फोनच्या (Smartphone) ऑनलाईन खरेदीमध्ये भारताने सर्व देशांना मागे टाकलं आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा झाला आहे. सर्व प्रमुख देशांमध्ये 2020 वर्षात भारतात मोबाईल फोनच्या विक्रीत ऑनलाईन चॅनेलची भागीदारी जवळपास 45 टक्के होती. मागील वर्षी जागतिक मोबाईल फोन बाजारात ऑनलाईन विक्रीचा वाटा जवळपास 26 टक्के होता, म्हणजेच विक्री झालेल्या चार मोबाईल फोनपैकी एक ऑनलाईन खरेदी करण्यात आला होता. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांच्या या बदलामध्ये कोरोनाची मोठी भूमिका होती. भारताने 45 टक्के सर्वाधिक ऑनलाईन भागीदारी दाखवली. त्यानंतर युकेमध्ये 39 टक्के आणि चीनने 34 टक्के भागीदारी दाखवली. ऑनलाईन विक्रीमध्ये ब्राजिल 31 टक्के, अमेरिका 24 टक्के, दक्षिण कोरिया 16 टक्के आणि नायजेरियामध्ये 8 टक्के भागीदारी होती.
मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, 2020 मध्ये ऑनलाईन हँडसेटच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर बाजारपेठेच्या आकाराच्या बाबतीत हे प्रमाण 10 टक्क्यांहून अधिक वाढलं आहे.
काउंटरपॉईंट रिसर्चचे वरिष्ठ विश्लेषक सुजोंग लिम यांनी सांगितलं, की 2020 च्या या अहवालानंतर आता 2021 मध्ये कोविड-19 वॅक्सिनेशननंतर काही प्रमाणात सहजता दिसून येईल. 2022 नंतर दरवर्षी यात वाढ होण्याची आशा आहे. कोरोनानंतर सावरणारी बाजारपेठ आणि मध्यम वयोगटातील लोकसंख्येकडून आयटी उपकरणं आणि इंटरनेटचा अधिक वापर ऑनलाईन खरेदीला पाठिंबा देत असल्याचं ते म्हणाले.