नवी दिल्ली, 15 मार्च : इंटरनेटच्या वाढत्या जगात सायबर क्राइम (Cyber Crime), ऑनलाइन फ्रॉडच्या (Online Fraud) प्रकरणात मोठी वाढ होत आहे. आतापर्यंत ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असचं एक प्रकरण समोर आलं असून यामुळे एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील तरुण चांगलाच त्रस्त झाला आहे. या तरुणाला इन्कम टॅक्स विभागाकडून (IT Department) तब्बल 300 कोटी रुपयांच्या ट्रान्झेक्शनची नोटिस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर हा तरुण अनेक ठिकाणी मदत मागत असून अद्यापही त्याला कोणतीही मदत न मिळाल्याने तो पेचात अडकला आहे. काय आहे प्रकरण - हा ऑनलाइल फ्रॉडचा प्रकार मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा येथील देशगाव या ठिकाणी घडला आहे. प्रविण राठोड नावाच्या मुलाला इन्कम टॅक्स विभागाकडून 300 कोटीच्या व्यवहाराची नोटिस मिळाली आहे. या तरुणाच्या बँक अकाउंटमध्ये मागील वर्षी 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांचं ट्रान्झेक्शन झालं होतं. ही माहिती इन्कम टॅक्स विभागाला मिळाल्यानंतर कारवाई करत तरुणाला नोटीस पाठवण्यात आली. इतक्या मोठ्या ट्रान्झेक्शनच्या नोटिशीने तरुण पुरता हादरला आहे. हा तरुण गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. सर्वसाधारण कुटुंबातील या तरुणाचं गावातच मोबाइल अॅक्सेसरीजचं एक दुकान आहे. हैराण करणारी बाब म्हणजे इतक्या कोटींचं हे ट्रान्झेक्शन थेट मुंबईत झाल्याचं नोटिशीत म्हटलं आहे. आणि हा तरुण एकदाही मुंबईत आलेला नाही. तरुणाच्या पॅन कार्डच्या आधारे मुंबईतील Axis बँकेतून हे ट्रान्झेक्शन करण्यात आलं आहे.
इन्कम टॅक्स विभागाने नोटीस पाठवून तरुणाला मुंबईतील अॅक्सिस बँक खात्यात 12 मार्च 2021 रोजी 290 कोटी 39 लाख 36 हजार 817 रुपयांच्या ट्रान्झेक्शनची माहिती मागवली असून त्याला 15 मार्चपर्यंत ऑफिसमध्ये येण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी त्याला अशा प्रकारच्या दोन नोटीस मिळाल्या होत्या. परंतु याकडे त्याने गंभीरतेने पाहिलं नाही. परंतु तिसरी नोटीस आल्याने तरुणाला मोठा झटका बसला आहे. या तरुणात गावात मोबाइल अॅक्सेसरीजचं दुकान आहे. परंतु त्याआधी तो इंदोरमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्यावेळी त्याच्याकडून अनेक कागदपत्र मागवण्यात आली होती. आता त्याला त्याच कागदपत्रांच्या आधारे त्याच्या नावे मुंबईत फेक अकाउंट ओपन केल्याचा संशय आहे. तो कधीही मुंबईत आला नाही तर बँक अकाउंट कसं ओपन होईल, त्याचं उत्पन्नही इतकं नसल्याने ट्रान्झेक्शन कसं झालं हा मोठा प्रश्न आहे. त्याच्या नावाने झालेल्या 300 कोटींच्या ट्रान्झेक्शनची त्याला कोणतीही माहिती नाही. फेक अकाउंटमध्ये अकाउंट ओपन करणाऱ्याचा पत्ताही मुंबईतील आहे. त्याच्या पॅन कार्डचा वापर करुन बँक अकाउंट ओपन करण्यात आलं.
पोलिसांकडूनही मदत नाही - या सर्व प्रकरणात त्याला स्थानिक पोलीस आणि इन्कम टॅक्सकडूनही कोणतीही मदत मिळत नसल्याने तरुण मेटाकुटीला आला आहे. त्याच्या गावातील पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी तरुण गेला त्याला FIR दाखल करण्यासाठी नकार देण्यात आला. हा फ्रॉड, ही बँक मुंबईत असल्याने तिथे तक्रार करण्याचं सांगितलं जात आहे. तक्रारही दाखल होत नसल्याने तो त्रस्त आहे. इन्कम टॅक्स विभागानेही या प्रकरणात कोणतीही फ्रॉडच्या दृष्टीने दखल घेतलेली नाही. इतकी मोठी रक्कम फेक अकाउंटमध्ये कशी गेली याबाबत आता बँकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.