नवी दिल्ली, 17 जून : देशात सतत होणाऱ्या सायबर फ्रॉडमुळे (Cyber Fraud) अनेक लोकांची मोठी फसवणूक झाली आहे. कोणतीही फसवणूक झाल्यास, त्वरित तक्रार दाखल करण्याबाबत सांगितलं जातं. गृह मंत्रालयाने इंटरनेट बँकिंगसह (Internet Banking) ऑनलाईन फायनान्स संबंधित फसवणुकीची तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबर जारी केला आहे. ऑनलाईन फसवणूक झाल्यास, पीडित व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांकडून चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाईनवर कॉल करू शकतात. जर फ्रॉड होऊन 24 तासांहून अधिक वेळ झाला असल्यास, पीडित व्यक्तीला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर एक तक्रार दाखल करावी लागेल. जर ऑनलाईन फ्रॉड होऊन 24 तासांहून कमी वेळ झाला असेल, तर ऑपरेटर फॉर्म भरण्यासाठी फसवणुकीचे डिटेल्स आणि पीडित व्यक्तीची खासगी माहिती मागितली जाईल.
देशात सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोरोना काळात अनेकांकडून ऑनलाईन व्यवहारांत वाढ झाली आहे. त्याचाच फायदा फ्रॉडस्टर्सकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे युजर्सनी काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पब्लिक वायफाय, फ्री वायफाय, सायबर कॅफे आणि इतरांशी शेअर होणाऱ्या पीसीवरुन इंटरनेट बँकिंगचा वापर करू नका. खासगी माहिती बँक साईटवर अपडेट केल्यावर रिवॉर्ड देण्याचा दावा करणाऱ्या ईमेल, एसएमएस आणि फोन कॉलपासून सावध राहा.
कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यावरुन App डाउनलोड करू नका. बँक साईटवर जाण्यासाठी कधीही मेल किंवा मेसेज बॉक्समध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. तसंच बँकेत KYC अपडेट करण्यासाठी कोणी कॉल केल्यास, त्याला डिटेल्स देऊ नका, बँक कधीही ग्राहकाचे डिटेल्स मागत नाही. तसंच टेलिकॉम कंपनीच्या नावानेही KYC साठी कॉल आल्यास सावध राहा. मेसेजमध्ये आलेल्या ऑफर्स, डिस्काउंटच्या लिंकवर क्लिक करू नका.