जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर झाला असेल, तर तुम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाइटवर तक्रार दाखल करू शकता.
नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : आधार कार्ड (Aadhar) आणि पॅन कार्ड (PAN) अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. अनेक काम या डॉक्युमेंट्सशिवाय होत नाहीत. या कागदपत्रांचा वापर जसा वाढतो आहे, तसे याद्वारे फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत. पॅनसंबंधी असचं एक फ्रॉडचं (PAN Related Frauds) प्रकरण नुकतंच समोर आलं. काही लोकांच्या पॅन कार्डवर एका App द्वारे लोन घेण्यात आलं. याबाबत त्यांना कोणतीही माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांनी आपला क्रेडिट स्कोर पाहिला त्यावेळी त्यांना पॅन कार्डवर लोन घेतलं गेल्याचं समजलं. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, फिनटेक कंपनी इंडियाबुल्सच्या (Indiabulls) धनी अॅपद्वारे (Dhani App) लोन घेण्यात आलं होतं. त्यामुळे पॅन कार्डची वेळोवेळी माहिती घेत राहणं अत्यावश्यक आहे. या धनी अॅपद्वारे सर्वसामान्यांनाच नाही, तर काही दिवसांपूर्वी सेलिब्रिटी अभिनेत्री सनी लिओनीचीही यात फसवणूक झाली होती. सनी लिओनीच्या नावे 2000 रुपये लोन घेण्यात आलं. सनी लिओनीने ट्विट करत याबाबत माहिती दिली. अनेक जणांनी सोशल मीडियावर त्यांना कोणतीही माहिती नसताना कोणीतरी वेगळ्याच व्यक्तीने लोन घेतल्याच्या तक्रारी केल्या आहेत. इंडियाबुल्सनेही धनी अॅपवर लोन फ्रॉडबाबत तक्रारी आल्या असून त्याबाबत कंपनी तपास करत असल्याचं म्हटलं आहे. धनी अॅपने 12 महिन्यात जवळपास 35 लाख लोकांना लोन दिलं आहे. गुगल प्ले स्टोरवर या अॅपचे 5 कोटी डाउनलोड आहेत. तुमच्या पॅनवर इतर कोणी लोन घेतलं आहे का हे तुम्ही घरबसल्या तपासू शकता.
कसे तपासाला PAN डिटेल्स - इन्कम टॅक्स विभागाकडून फॉर्म 26AS ची सुविधा दिली जाते. याद्वारे तुम्ही पॅन कार्डचे डिटेल्स तपासू शकता. या फॉर्ममध्ये संपूर्ण माहिती असते, की तुमच्या पॅन कार्डचा कुठे वापर करण्यात आला. हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉगइन करावं लागेल. हा फॉर्म TRACES पोर्टलवरुनही डाउनलोड करू शकता.
अशी करा तक्रार - तुमची पॅन कार्डसंबंधी कोणतीही तक्रार असल्यास इन्कम टॅक्स पोर्टलवर ऑनलाइन तक्रार करू शकता. सर्वात आधी www.incometax.intelnetglobal.com वर जावं लागेल. इथे मागितलेले डिटेल्स भरुन सबमिटवर क्लिक करा. त्यानंतर तक्रार करू शकता.