नवी दिल्ली, 8 जानेवारी : एकीकडे ऑनलाइन पेमेंट, इंटरनेट बँकिंगचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून दुसरीकडे सायबर क्राइमच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. WhatsApp, Facebook, Email सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑफर, डिस्काउंट, KYC अशा जाळ्यात अडकवून अनेकांची फसवणूक झाली आहे. केवळ सर्वसामान्यचं नाही, तर बॉलिवूड अभिनेत्यालाही यात अडकलं जाण्याचा प्लॅन होता. अभिनेत्याच्या नावाने कोट्यवधींची मागणी केल्याचं समोर आलं आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावच्या नावाने फेक ईमेल आयडी बनवून फ्रॉडचा प्रकार समोर आला आहे. फेक ईमेल आयडीवरुन लोकांकडून 3 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्लॅन होता. फ्रॉडस्टर्सनी त्याच्या नावाने फिल्म अॅग्रिमेंटसाठी 3 कोटी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु वेळीच हा प्रकार समजल्यानंतर राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्रामवरुन सर्वांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. राजकुमार रावने या फेक ईमेल आयडीची एक कॉपी शेअर केली आहे.
अशा प्रकारच्या लोकांपासून सावध राहा. मी कोणत्याही सौम्या नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही. हे लोक फेक ईमेल आयडी आणि मॅनेजर्सचा वापर करुन लोकांची फसवणूक करत आहेत, असं त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
राजकुमार रावने ईमेलचा एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. एका चित्रपटाच्या नावाने अॅग्रिमेंट करण्याबाबत मेल करण्यात आला. त्यात बँक अकाउंटमध्ये 3 कोटी 10 लाख रुपये जमा झाल्यास अॅग्रिमेंट झाल्याचं समजलं जाईल. मॅनेजरकडे 10 लाख कॅश किंवा 3 कोटी चेकने जमा करण्याबाबत मेलमध्ये लिहिलं आहे. हा मेल स्वत: राजकुमार रावने लिहिला असल्याचं भासवण्यात आलं आहे. केवळ राजकुमार रावच नाही, तर याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावे फ्रॉड करण्याचं प्लॅनिंग करण्यात आलं होतं. यात अमिताभ बच्चन, स्वरा भास्कर, श्रृती हसन, अमिषा पटेल, फराह खान, उर्मिला मातोंडकर अशा अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंटही हॅक झाल्याचं अनेकदा समोर आलं आहे.