नवी दिल्ली, 14 मार्च : कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) वेंडर मोबाईल अॅप्लिकेशन ‘भारत ई मार्केट’’ (Bharat e Market) महाशिवरात्रीच्या निमित्तानं नुकतच लॉन्च केलं. यामुळे ग्राहकांना आनलाईन शॉपिंगसाठी केवळ ई-कॉमर्स कंपनी (E-Commerce Company) अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवलंबून राहवं लागणार नाही. सुमारे 8 कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAIT ने विक्रेता मोबाईल अॅप्लिकेशन ‘भारत ई मार्केट’चं लॉन्चिंग दिल्ली येथे केलं. हा पूर्णपणे देशी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. CAIT च्या म्हणण्यानुसार भारत ई मार्केट हे आधुनिक तंत्रज्ञान, मजबूत वितरण, नाविन्यपूर्ण विपणन, कार्यक्षम डिजीटल पेमेंटसह जबाबदार आणि पारदर्शक व्यापारी प्रणालीच्या आधारे तयार करण्यात आलं आहे. हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगातील कोणत्याही ई-कॉमर्स पोर्टलशी स्पर्धा करेल. ‘भारत ई मार्केट’ सर्वात कमी दरात सामान आणि साहित्य पुरवठा करेल, त्यामुळे हे ग्राहकांसाठी फायदेशीर ठरेल असा दावा CAIT नं केला आहे. देशातील विविध राज्यांमधील मोठ्या व्यापाऱ्यांचा समावेश - ई-कॉमर्स पोर्टल ‘भारत ई मार्केट’ सुरू करण्यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यात व्यापारी आणि सेवा पुरवठादारांकरता आपलं ई-दुकान (E-Dukan) या पोर्टलवर सुरू करण्यासाठी एक मोबाईल अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. यावेळी CAIT चे दिल्लीसह देशातील विविध राज्यांमधील मोठे व्यापारी तसंच व्यापाराशी निगडीत ट्रान्सपोर्ट, शेतकरी, लघु उद्योजक, महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे, फेरीवाले हे घटक तसंच राष्ट्रीय संघटनांचे नेते उपस्थित होते.
स्थानिक उत्पादनांना मिळेल प्रोत्साहन - CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी याबाबत सांगितलं की, गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लोकल फॉर वोकल (Local for Vocal) आणि आत्मनिर्भर भारतचं (Aatmanirbhar Bharat) आवाहन केलं होतं. त्यात भारतीय वस्तू आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला होता. CAIT ने या योजनांर्तगत ‘भारत ई मार्केट’ पोर्टल लॉन्च करण्याचं ठरवलं होतं. कारण या माध्यमातून भारतीय वस्तुंचं उत्पादक आणि व्यापाऱ्यांना या पोर्टलवर आपलं ई-दुकान सुरू करता येईल आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळू शकेल. या पोर्टलच्या माध्यमातून व्यापारी ते व्यापारी आणि व्यापारी ते ग्राहक असा व्यापर अत्यंत सहजतेनं होईल.
‘भारत ई मार्केट’ची वैशिष्ट्यं - - या पोर्टलवरुन व्यापारी ते व्यापारी (B2B) आणि व्यापारी ते ग्राहक (B2C) अशी माल विक्री आणि खरेदी होई शकेल. - या पोर्टलवर आपले ई-दुकान सुरु करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मोबाईल अॅपवरुन रजिस्ट्रेशन करावं लागेल. - या अॅपवरील कोणातिही माहिती परदेशात जाणार नाही. कारण हे पूर्णतः डोमेस्टिक अॅप आहे. या अॅपवरील सर्व डेटा देशातच राहिल, तो विक्री केला जाणार नाही.
- या प्लॅटफॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची विदेशी मदत स्वीकारली जाणार नाही. - कोणताही विक्रेता या पोर्टलवर चिनी वस्तूंची विक्री करणार नाही - देशातील कानाकोपऱ्यात विखुरलेले स्थानिक कारागिर, शिल्पकार तसंच विविध वस्तुंचे निर्माते आणि व्यापाऱ्यांना या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजार उपलब्ध होईल. - या पोर्टलवरुन व्यवसाय करण्यासाठी कोणतेही कमिशन घेतलं जाणार नाही.