नवी दिल्ली, 29 मार्च : भारतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात महागाईचा फटका बसतो आहे. एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder), पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel), सीएनजी (CNG) अशा गोष्टींचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता कार्सच्या किमतीही (Car Price Hike) वाढणार आहे. वाढत्या महागाईचा परिणाम कार निर्मात्या कंपन्यांवरही होतो आहे. अनेक कार निर्मात्या कंपन्यांनी कमर्शियल व्हीकल रेंज अर्थात कार्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टील, अॅल्युमिनियम आणि इतर महागड्या मेटल्ससह सर्व कच्च्या मालाच्या किमती सतत वाढत आहेत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानेच कमर्शियल वाहनांच्या किमती वाढवणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. टाटा मोटर्स ते अगदी BMW पर्यंतच्या, तसंच सर्वसामान्यांच्या बजेटपासून ते अति महागड्या अशा सर्वच रेंजमधील कार्सच्या किमतीत वाढ होत आहे. Tata Motors - भारतातील ऑटो सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी टाटा मोटर्सनेही आपल्या कार्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2022 पासून वेगवेगळ्या मॉडेल आणि वेरिएंटच्या आधारे गाडीच्या किमतीत 2 ते 2.5 टक्क्यांची वाढ लागू केली जाणार आहे. BMW - BMW India नेही 1 एप्रिल 2022 पासून बीएमडब्ल्यू मॉडेल रेंजच्या किमती 3.5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
Mercedes-Benz - मर्सिडीज बेंजने इनपुट कॉस्ट वाढल्याने कारच्या किमती वाढवणार असल्याची माहिती दिली आहे. ही इनपुट कॉस्ट कमी करण्यासाठी याचा भार ग्राहकांवर टाकला जाणार आहे. 1 एप्रिल 2022 पासून कंपनीने सर्व मॉडेल रेंजच्या किमतीत 3 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीकडून किरकोळ विक्री केलेल्या कारच्या किमती पुढील महिन्यापासून 50000 ते 5 लाख रुपयांनी वाढणार आहेत.
Toyota Kirloskar - कच्च्या मालाच्या वाढत्या दराचा परिणाम कमी करण्यासाठी कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोसर्कर मोटरने 1 एप्रिल 2022 पासून आपल्या सर्व मॉडेल रेंजच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या मालासह कार बनवण्याच्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने कारच्या किमतीत वाढ होत आहे.