नवी दिल्ली, 11 जानेवारी : व्हॉट्सअॅप (Whatsapp) ही बहुतेकांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाची बाब झाली आहे. दैनंदिन जीवनात मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्यासापासून ते ऑफिसातील कामकाजाबाबत चर्चा करणे, निरोप देणे यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅप वापरणे हे अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या सवयीचं झालं आहे; पण नुकत्याच उघडकीस आलेल्या व्हॉट्सअॅपमधील एका धोकादायक समस्येनं सर्वांची झोप उडवली आहे. समजा, तुम्ही व्हॉट्सअॅपवर आपल्या ऑफिसच्या टीमशी काहीतरी महत्त्वाची माहिती देत आहात आणि अचानक एखादी अनोळखी व्यक्ती त्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होते. त्यामुळे त्या व्यक्तीला तुमच्या ग्रुपची माहिती, ग्रुप मेंबर्सचे फोटो आणि इतर माहिती मिळते. तुमचं वैयक्तिक, खासगी संभाषणदेखील गुगलद्वारे (Google) पाहिलं जात आहे. 2019 मध्ये व्हॉट्सअॅपमध्ये हीच त्रुटी निर्माण झाली होती, तेव्हा ती दूर करण्यात आली होती. पण आता पुन्हा ही समस्या उदभवली असून, यामुळे अनेक युजर्स हैराण झाले आहेत.
इंटरनेट सिक्युरिटी राजशेखर राजाहरिया यांच्या मते, जे लोक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी लिंकचा वापर करतात, ते पुन्हा एकदा ऑनलाईन आढळण्याचा धोका असून, त्यामुळे युजरच्या पर्सनल चॅटमध्येही अचानक कोणीही सामील होऊ शकतं. व्हॉट्सअॅप ग्रुप्ससाठी इंडेक्स (Whatsapp Group Index) सुरू केल्यानंतर इंटरनेटवर प्रायव्हेट ग्रुपसाठी लिंक सर्च केली जाऊ शकते आणि जॉईनही करता येतं. यामुळे सर्च करणाऱ्याला दुसऱ्याचा फोटो आणि मोबाईल क्रमांक मिळू शकतो. मात्र गॅजेट 360नं दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपने ग्रुप इंडेक्स करण्यासाठी गुगलवर चॅट इनव्हाईट (Chat invite) कधी सुरू केलं आहे, याबाबत माहिती नाही. मात्र गुगल सर्चमध्ये 1500 ग्रुप इनव्हाईट लिंक उपलब्ध आहे.
स्वतःची ओळख लपवू शकते व्यक्ती : ग्रुपमध्ये अचानक सामील झालेल्या ती अनोळखी व्यक्ती सदस्यांपासून काही वेळासाठी आपली ओळखही लपवू शकते. यात सगळ्यात मोठी उणीव ही आहे, की त्या अनोळखी व्यक्तीला ग्रुपमधून काढून टाकलं तरी त्या व्यक्तीचा फोन क्रमांक आणि माहिती ग्रुपवर शिल्लक राहते. 2019 मध्ये एका सिक्युरिटी संशोधकाने (Security Researcher) ही समस्या शोधून काढली होती. त्या वेळी ही अडचण दूरही करण्यात आली होती. पण आता पुन्हा ही समस्या उदभवली आहे.
ग्रुप इनव्हाईट लिंक्सबाबतच नव्हे तर सिंगल युजर अकाउंट्सबाबतही ही समस्या जाणवत आहे. लोकांच्या प्रोफाईलच्या युआरएल (URL) गुगलवर सर्च केल्या जात आहेत. यामुळे अनोळखी व्यक्तीचं प्रोफाईल, फोन क्रमांक उपलब्ध होतो. 2020 मध्येही ही समस्या निदर्शनास आली होती, जून 2020 मध्ये ती दूर करण्यात आली होती.