नवी दिल्ली, 25 जून : मागील कित्येक काळापासून अनेक जण महत्त्वाची कामं आपल्या स्मार्टफोनवरुन करतात. यात बँकेसंबंधी कामदेखील सामिल आहेत. अशाच सायबर फ्रॉडची शक्यताही वाढते. सायबर क्रिमिनल्स फ्रॉड करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करतात. त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. सायबर क्रिमिनल्स कोणकोणत्या पद्धतींनी फसवणूक करतात हे माहित असणंही तितकंच गरजेचं आहे. UPI - UPI च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फ्रॉड केल्याचं समोर आलं आहे. यूपीआयद्वारे फ्रॉड करणारे एखाद्या व्यक्तीला डेबिट लिंक पाठवतात आणि त्यावर समोरच्या व्यक्तीने क्लिक केल्यानंतर, आपला पीन टाकल्यानंतर त्याच्या खात्यातून पैसे कट होतात. अशाप्रकारच्या फ्रॉडपासून वाचण्यासाठी फोनवर आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. QR कोड - QR अर्थात क्विक रिस्पॉन्स कोडद्वारे फ्रॉड केले जातात. फ्रॉड करणारे मोबाईलवर क्यूआर कोड पाठवतात. समोरच्याने क्यूआर कोड लिंकवर क्लिक केल्यानंतर फ्रॉडस्टर्स क्यूआर कोड स्कॅन करुन खात्यातून पैसे काढून घेतात. नोकरीच्या नावाने फसवणूक - नोकरीच्या नावाने खोट्या जाहिराती दिल्या जातात किंवा एक लिंक दिली जाते आणि त्यावर क्लिक केल्यानंतर नोकरीसंबंधी माहिती मिळेल, असं सांगितलं जातं. जॉब अलर्ट नावाने फी मागितली जाते. त्यामुळे नोकरीच्या नावाने किंवा एखाद्या पोर्टलवर नोकरी देत असल्याच्या नावाने पेमेंट करायचं सांगितलं जातं, अशावेळी त्या पोर्टलची संपूर्ण माहिती घेणं अतिशय गरजेचं आहे.
बँक खात्याच्या नावाने फ्रॉड - फ्रॉड करणारे बँक खात्याच्या चौकशीच्या नावाने फ्रॉड करतात. KYC नावाने आपल्या बँक खात्यात फ्रॉड केले जातात. त्यामुळे खासगी माहिती कोणाशीही शेअर करू नये.
ATM कार्ड क्लोनिंग - एटीएम क्लोनिंगद्वारे फ्रॉड करणारे ग्राहकाची संपूर्ण माहिती चोरी करतात आणि डुप्लीकेट कार्ड बनवून खात्यातून पैसे काढतात. सायबर फ्रॉडमुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हेल्पलाईन नंबर 155260 जारी करण्यात आला आहे. गृहमंत्रालयाकडून हा नंबर सुरू करण्यात आला आहे. हेल्पलाईन नंबरशिवाय https://cybercrime.gov.i/ या वेबसाईटवरही तक्रार दाखल करता येऊ शकते.