मुंबई, 7 मे : किक्रेट हा असा खेळ आहे, ज्यात खेळासोबत भरपूर कथा आणि गोष्टी सामावल्या आहेत. अधूनमधून खेळाडू त्याबद्दल बोलत असतात. असाच एक किस्सा भारतीय क्रिकेट संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने सांगितला आहे. डेव्हिड वॉर्नरबाबत (David warner) वीरेंद्र सेहवागने (Virender sehwag) हा धक्कादायक खुलासा केला आहे. 2009 मध्ये जेव्हा तो दिल्ली डेअरडेव्हिल्सचा (आता दिल्ली कॅपिटल्स) कर्णधार होता. वॉर्नर तेव्हा संघात नवीन होता आणि सराव किंवा सामने खेळण्यापेक्षा पार्टी करण्यावर त्याचा भर होता. पहिल्याच वर्षी त्याचे अनेक खेळाडूंशी भांडण झाले, त्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. वीरेंद्र सेहवागने 1999 मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि 15 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. यादरम्यान सचिन तेंडुलकरसोबत डावाची सुरुवात करण्यापासून ते महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्यापर्यंत अनेक दिग्गजांशी त्याने टीम इंडियाची ड्रेसिंग रूम शेअर केली. भारतीय संघाबाहेर सेहवागने इंडियन प्रीमियर लीगमधील जगातील काही महान खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम देखील शेअर केली. तो प्रथम दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) आणि नंतर किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) चा कर्णधार होता. ‘वेग हेच सर्वस्व नाही, मेंदूही वापरावा लागतो’… विश्वविजेत्या गोलंदाजाने उमरान मलिकचे टोचले कान सेहवाग आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात म्हणजेच 2009 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा (आता दिल्ली कॅपिटल्स) कर्णधार होता. या संघाचा कर्णधार म्हणून त्याने डेव्हिड वॉर्नरशी संबंधित एक मनोरंजक किस्सा सांगितला. वॉर्नर पहिल्यांदाच आयपीएल खेळत होता आणि दिल्ली संघाचा भाग होता. पण त्याला शिस्तीत ठेवणे हे फार कठीण आव्हान होते. सेहवागने सांगितले की त्या काळात वॉर्नरला कर्णधार म्हणून सांभाळणे एक दिव्यच होतं. कारण ड्रेसिंग रूममध्येही तो खेळाडूंशी भांडत असे. वॉर्नरच्या याच वागण्यामुळे संघ व्यवस्थापनाला त्याला परत पाठवणे भाग पडले. वॉर्नर सरावापेक्षा जास्त पार्टी करायचा : सेहवाग सेहवागने क्रिकबझसोबतच्या संभाषणात सांगितले की, “मीही अनेक खेळाडूंवर माझा राग काढला आहे आणि डेव्हिड वॉर्नर त्यापैकी एक होता. कारण, तो संघात नवीन असताना सराव करण्यापेक्षा किंवा मॅच खेळण्यापेक्षा पार्टी करण्यावर जास्त भर होता. पहिल्याच वर्षी त्याचे अनेक खेळाडूंशी भांडण झाले, त्यामुळे आम्ही त्याला शेवटच्या दोन सामन्यांमधून वगळले. कधी कधी असं होतं की तुम्ही एखाद्याला धडा शिकवण्यासाठी काहीतरी करता. तो नवीन होता, त्यामुळे संघासाठी तो एकटाच आवश्यक नाही, बाकीचे खेळाडूही महत्त्वाचे आहेत, हे त्याला दाखवून देणे आवश्यक होते. इतर अनेक खेळाडू आहेत जे संघासाठी सामने खेळू शकतात आणि जिंकू शकतात आणि तेच झाले. आम्ही वॉर्नरला संघाबाहेर ठेवले आणि आम्ही जिंकलो."