मुंबई, 8 जानेवारी : शनिवारी पारपडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकवर दणदणीत विजय मिळवला. भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव या विजयाचा शिल्पकार ठरला असून त्याने अवघ्या 45 चेंडूत केलेले शतक भारताच्या विजयासाठी अत्यंत मोलाचे ठरले. काल झालेल्या सामन्यात सूर्याने 51 चेंडूत 112 धावा केल्या, यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 9 षटकार ठोकले. भारताने या सामन्यात श्रीलंकेसमोर विजयासाठी 228 धावांचे आव्हान दिले होते, मात्र श्रीलंका केवळ 137 धावा करूनच पॅव्हेलियनमध्ये परतली. भारताने श्रीलंका विरुद्ध टी 20 मालिका 2-1 या आघाडीने जिंकली. भारताकडून विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमार यादवला प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने गौरविण्यात आले. परंतु सध्या चहू बाजुंनी कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या सूर्यकुमार यादवला कधीकाळी संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. हे ही वाचा : सूर्यकुमारची चौफेर फटकेबाजी, टी20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज 32 वर्षीय सूर्यकुमारलाही कारकिर्दीत खडतर टप्प्यातून जावे लागले. रणजी ट्रॉफीमध्ये त्याला मुंबई संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. परंतु खराब कामगिरीमुळे 2014-15 मध्ये त्याच्याकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. 2018-19 हंगामापूर्वी त्याला संघातून वगळण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुर्याने चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुनरागमन केले आणि तो पुन्हा कर्णधार झाला. यानंतर, आयपीएल आणि आता भारतीय संघात चांगली कामगिरी करून तो टी-20 चा नंबर-1 फलंदाज बनला आहे. सूर्यकुमारला अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये संधी नाही : 32 वर्षीय सूर्याने मार्च 2021 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय तर जुलै 2021 मध्ये वनडे सामन्यांमध्ये पदार्पण केले. तरीही त्याला आतापर्यंत कसोटी क्रिकेट संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याचा प्रथम श्रेणीचा विक्रम चांगला असून त्याने येथे द्विशतकही ठोकले आहे. सूर्याने आतापर्यंत 79 प्रथम श्रेणी सामन्यांच्या 132 डावांमध्ये 45 च्या सरासरीने 5549 धावा केल्या आहेत. त्याने 14 शतके आणि 28 अर्धशतके केली आहेत. 200 धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. म्हणजेच कसोटीत मोठी खेळी खेळण्यासाठी ते सज्ज आहेत. नुकताच तो रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमातही खेळत होता.