राजकोट, 07 जानेवारी : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात सूर्यकुमार यादवने चौफेर फटकेबाजी केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना सूर्यकुमार यादवने अवघ्या 45 चेंडूत शतक झळकावलं. तर 51 चेंडूत नाबाद 112 धावांच्या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधलं सूर्यकुमारचं हे तिसरं शतक ठरलं आहे. सूर्यकुमार यादवने याआधी जुलै 2022 मध्ये त्याचं पहिलं वहिलं टी20 शतक झळकावलं होतं. तेव्हा इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहँममध्ये 55 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. त्यानतंर नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 51 चेंडूत नाबाद 11 धावांची खेळी सूर्युकमारने केली होती. सूर्यकुमार यादवने सलामीला न खेळता तिन्ही शतके केली आहेत. टी२० मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. हेही वाचा : IND Vs SL : सूर्यकुमार यादवचं झंझावाती शतक, श्रीलंकेसमोर 229 धावांचे आव्हान सूर्यकुमार यादवने फक्त 43 डावात 3 शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. टी20 क्रिकेटमध्ये फक्त 843 चेंडूत 1500 धावा पूर्ण केल्या असून याबाबतीत तो सर्वात वेगवान ठरला आहे. टी20 क्रिकेटमध्ये तीन शतके करणाऱ्या सूर्यकुमारच्या पुढे आता शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा आहे.
टी20 मध्ये सर्वात कमी चेंडूत शतक साजरं करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सूर्यकुमार यादव दुसऱ्या नंबरवर आहे. पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 35 तर सूर्यकुमार यादवने 45 चेंडूत शतक झळकावलं आहे. या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानी असून त्याने 46 चेंडूत शतक केलं होतं. तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवच असून त्याने इंग्लंडविरुद्ध 48 तर न्यूझीलंडविरुद्ध 49 चेंडूत शतक केले होते.