gavaskar
नवी दिल्ली, 10 जुलै : जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेले सुनील गावसकर आज 10 जुलै 2022 रोजी 73 वर्षांचे झाले. आपल्या कारकिर्दीत क्रिकेटशी संबंधित अनेक विक्रम करणाऱ्या गावसकर यांना ‘लिटल मास्टर’ देखील म्हटले जाते. कसोटीत 10,000 धावा करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू आहे. गावस्कर यांच्या जन्माशी संबंधित एक किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे की, जर त्यांच्या काकांनी लक्ष दिले नसते तर ते कदाचित मच्छीमार म्हणून राहिले असते. सुनील गावसकर यांनी क्रिकेटच्या खेळात स्वतःची वेगळी शैली निर्माण केली आणि मोठ्या संख्येने तरुण आणि नवोदित क्रिकेटपटूंना प्रेरणा दिली. एक काळ असा होता की गावस्कर मैदानात असले की दिग्गज वेगवान गोलंदाजही त्यांच्यावर वर्चस्व गाजवू शकत नव्हते. इतकंच नाही तर ते हेल्मेटशिवाय फलंदाजीला यायचे. गावसकर यांनी 1971 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. या सामन्याच्या दोन्ही डावात त्यांनी अर्धशतके झळकावली. एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी त्यांना सुमारे 3 वर्षे लागली. 1974 मध्ये, त्यांनी लीड्समध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. गावसकर यांचा जन्म 10 जुलै 1949 रोजी मुंबईत झाला. गावसकर यांनी त्यांच्या ‘सनी डेज’ या आत्मचरित्रातही हा किस्सा सांगितला आहे. सुनील यांच्या जन्मानंतर त्याचे काका नारायण मसुरकर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी सुनील यांना उचलून जवळ घेतले, पाहिले. त्यावेळी त्यांना त्याच्या कानाजवळ एक ‘बर्थमार्क’ असल्याचे दिसले. हे वाचा - एका वर्षात काय बदललं? रवी शास्त्रींनी ठेवलं टीम इंडियाच्या दुखऱ्या जागेवर बोट! काका दुसऱ्या दिवशी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांनी पुन्हा मुलाला उचलून घेतले. मात्र, त्यांना धक्काच बसला. कारण त्यांनी उचललेल्या बाळाच्या कानाजवळ ‘बर्थमार्क’ दिसलीच नाही. नारायण यांनी हा प्रकार रुग्णालय प्रशासनाला सांगितला आणि त्यानंतर लहानग्या सुनीलचा बराच वेळ शोध घेण्यात आला. त्यानंतर मच्छीमार कुटुंबातील एक महिला सुनीलला कुशीत घेऊन झोपलेली दिसली. कदाचित परिचारिकेच्या चुकीमुळे मुलांमध्ये अदला-बदल झाला असावा, पण रुग्णालय प्रशासनाने त्यात सुधारणा करून लहानग्या सुनीलला पुन्हा त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. हे वाचा - भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा महामुकाबला, पाहा कुठे आणि कधी होणार टक्कर? गावस्कर यांच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्यांनी 125 कसोटी सामन्यांमध्ये 34 शतके आणि 45 अर्धशतकांसह एकूण 10122 धावा केल्या. याशिवाय त्यांनी 108 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह एकूण 3092 धावा केल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 25834 धावा केल्या ज्यात 81 शतकांचा समावेश आहे.