मुंबई, 13 जानेवारी : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एकदा मॅच सुरू झाली की तिचा निकाल काय लागेल, हे सांगता येत नाही. अनेकदा मॅचदरम्यान काही अनाकलनीय गोष्टीदेखील घडतात. या गोष्टींमुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटतं. विशेषत: जेव्हा एखादा बॅट्समन गगनचुंबी सिक्स मारतो किंवा एखादा फिल्डर अप्रतिम कॅच घेतो, तेव्हा प्रेक्षकांना जास्त आनंद होतो. असचं काहीसं दृश्य दक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट चाहत्यांना बघायला मिळालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकाच शॉटमध्ये चाहत्यांना सिक्स आणि कॅचचा थरार अनुभवता आला. सध्या दक्षिण आफ्रिकेत टी-20 क्रिकेट लीग सुरू आहे. या लीगमधील मॅचमध्ये एका बॅट्समननं 104 मीटर लांबीचा सिक्स मारला मात्र, एका प्रेक्षकानं हवेत कॅच घेऊन बॉल अडवला. दक्षिण आफ्रिकेमध्ये आयपीएलच्या धर्तीवर टी-20 क्रिकेट लीग सुरू करण्यात आली आहे. बुधवारी (11 जानेवारी) संध्याकाळी जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि डर्बन सुपर जायंट्स या दोन टीममध्ये मॅच झाली. जोहान्सबर्ग टीमनं अगोदर बॅटिंग करून 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट्सच्या बदल्यात 190 रन्स केले. या टारगेटचा पाठलाग करणारी डर्बन सुपर जायंट्स टीम 174 रन्सवर ऑल आउट झाली. डोनोव्हन फेरेरा जोहान्सबर्ग सुपर किंग्जच्या विजयाचा हिरो ठरला. त्यानं 40 बॉल खेळून 82 रनांची धडाकेबाज खेळी केली.
हेही वाचा : हार्दिक पांड्याची घसरली जीभ, वेळेत पाणी न मिळाल्याने दिली शिवी 200 च्या स्ट्राईक रेटनं खेळलेल्या या इनिंगमध्ये फेरेरानं पाच सिक्स आणि आठ फोर मारले. त्याने मैदानावर मारलेला प्रत्येक सिक्स अप्रतिम होता. त्याच्या प्रत्येक शॉटमध्ये क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंची झलक दिसली. फेरेरानं मारलेल्या सिक्सपैकी एक सिक्स 104 मीटर लांबीचा होता. या शॉटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. फेरेरानं सिक्स मारल्यानंतर एका प्रेक्षकानं अगदी सहजपणे कॅच घेतला. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कॅमेऱ्याचा फोकस वारंवार त्या प्रेक्षकाकडे गेला आहे. कॅच घेतल्यानंतर तो प्रेक्षक आरामात हातातील ड्रिंक पिताना दिसत आहे. शिवाय, त्यानं कॅमेऱ्याकडे बघून हात हलवून लोकांकडून होणारं कौतुकही स्वीकारलं. आयपीएलमध्येही दिसणार डोनोव्हन फेरेरा डोनोव्हन फेरेरा आयपीएल 2023 मध्ये खेळताना दिसणार आहे. तो राजस्थान रॉयल्स टीमचा भाग असेल. राजस्थान फ्रँचायझीनं त्याला 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. आयपीएल 2023 च्या लिलावात फेरेराची बेस प्राईस फक्त 20 लाख रुपये होती.