मुंबई,11 जानेवारी : वारंवार भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला पृथ्वी शॉ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. कालच रणजी ट्रॉफी सामन्यात पृथ्वीने नाबाद दुहेरी शतक ठोकून सर्वांचे लक्ष वेधले होते. आता याच पृथ्वीने पुन्हा एकदा नाबाद त्रिशतक झळकावून भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. आसाम विरुद्धच्या रणजी सामन्यात मुंबईकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने आतापर्यंत 379 धावांची खेळी केली आहे. परंतु पृथ्वी अजूनही मराठमोळे क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांचा 74 वर्ष जुना रेकॉर्ड मोडू शकला नाही. मुंबई विरुद्ध आसाम यांच्यात सुरु असलेल्या रणजी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. काल सामन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईकडून खेळत असलेल्या पृथ्वी शॉने 250 चेंडूत 213 धावांची नाबाद खेळी केली होती. परंतु दुसऱ्या दिवशी सामना सुरु होताच पृथ्वीने हुसेन बोल्डच्या वेगाने 60 रन करून 300 धावा पूर्ण केल्या. त्रिशतक करूनही पृथ्वी अजूनही मैदानावर कायम आहे. परंतु तो अजूनही मराठमोळे क्रिकेटपटू भाऊसाहेब निंबाळकर यांच्या 74 वर्षांपूर्वी रणजी सामन्यातील रेकॉर्डपासून दूर आहे. कोण आहेत भाऊसाहेब निंबाळकर ? भाऊसाहेब निंबाळकरहे महाराष्ट्र संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले खेळाडू होते. महाराष्ट्रातर्फे रणजी स्पर्धेत त्यांनी एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम केला होता. 1948-49 च्या हंगामात पुणे येथे काठियावाड संघाविरुद्ध त्यांनी नाबाद 443 धावांची खेळी करून एक असाधारण विक्रम आपल्या नावे केला जो 74 वर्षांनंतरही अबाधित आहे. काठियावाडच्या कर्णधाराने सामनाच सोडून दिल्याने भाऊसाहेबांची डॉन ब्रॅडमनचा तत्कालीन विक्रम मोडण्याची संधी हुकली होती. 443 धावा हा आजही भारतीय प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा डाव आहे; तसेच भारतीय प्रथमश्रेणीतील हे आजवरचे एकमेव चतुःशतकही आहे. निंबाळकरांनंतर त्रिशतकांच्या यादीत संजय मांजरेकर यांचेही नावं येते. संजय यांनी रणजी सामन्यात 377 धावांची खेळी केली होती. पृथ्वीने त्यांचा हा रेकॉर्ड नाबाद केली करत तोडला आहे. परंतु तो अजूनही निंबाळकरांच्या रेकॉर्ड पासून फार दूर आहे.