JOIN US
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / ओडिशा कसे बनले भारतीय हॉकीचा 'तारणहार'? वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा दुसऱ्यांदा मान

ओडिशा कसे बनले भारतीय हॉकीचा 'तारणहार'? वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा दुसऱ्यांदा मान

Hockey World Cup 2023: युरोप किंवा इतरत्र जेव्हा हॉकी वर्ल्ड कप व्हायचा तेव्हा फुटबॉल स्टेडियममध्ये काही दिवसांसाठी हॉकी स्टेडियमचं रुप दिलं जायचं. पण ओडिशा सरकारने फक्त हॉकीसाठी स्टेडियम उभारलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भुवनेश्वर, 14 जानेवारी : हॉकी वर्ल्ड कपला ओडिशात 13 जानेवारीपासून सुरुवात झालीय. सलग दुसऱ्यांदा ओडिशाने हॉकी वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवलं आहे. यामुळे पुन्हा एकदा ओडिशाची आणि भारतीय हॉकीची चर्चा सोशल मीडियावर होतेय. एकेकाळी हॉकीवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची गेल्या चार ते पाच दशकातली परिस्थिती बिकट अशी होती. मात्र गेल्या दीड दोन दशकात यासाठी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अनेक प्रयत्न केले. ओडिशा सरकार यात रस घेण्याचं कारण म्हणजे सध्याचे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी केलेले प्रयत्न. दिलीप तिर्की हे भारतीय हॉकी संघाचे कर्णधार होते. ते असे एकमेव आदिवासी खेळाडू आहेत ज्यांनी तीन ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. कर्णधार म्हणून 2000 मध्ये त्यांची ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी भेट झाली होती. नवीन पटनायक हे शालेय जीवनात हॉकी खेळायचे. ते गोलकिपरसुद्धा होते. त्यामुळे हॉकी खेळावर नवीन पटनायक यांचं प्रेमही आहे. नवीन पटनायक यांना दिलीप तिर्की यांनी हॉकीकडे विशेष लक्ष देण्याची विनंती केली होती. तुम्ही हॉकीमध्ये गुंतवणूक केलीत तर ओडिशासुद्धा जगाच्या नकाशावर झळकेल असं दिलीप यांनी मुख्यमंत्री पटनायक यांना सांगितलं होतं. तेव्हापासून ओडिशाने हॉकी खेळाडूंच्या ट्रेनिंगवर लक्ष दिलं आणि मुलभूत सोयीसुविधा वाढवल्या. हेही वाचा :  हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सुरुवात; स्पेनला 2-0ने नमवले 2014 मध्ये FIH चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन ओडिशात करण्यात आले होते. त्यात जगातील टॉपचे 8 संघ खेळले होते. तर 2018 मध्ये हॉकी वर्ल्ड कपचे आयोजनही भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये झालं. 2021 मध्ये ज्यूनियर मेन्स वर्ल्ड कपसुद्धा ओडिशात झाला. हॉकीसाठी खास स्टेडियम ओडिशात राउरकेला इथं असलेलं बिरसा मुंडा स्टेडियम हे जगातलं सर्वात मोठं हॉकी स्टेडियम आहे. जागतिक स्तरावरील सर्व सुविधा इथे खेळाडूंना पुरवल्या जातात. ऑलिम्पिक व्हिलेजच्या धर्तीवर स्टेडियमच्या आवारातच 225 खोल्यांचं हॉकी व्हिलेज बनवण्यात आलं आहे. याठिकाणी देशविदेशातील खेळाडूंच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची सुविधा केली आहे. युरोप किंवा इतरत्र जेव्हा हॉकी वर्ल्ड कप व्हायचा तेव्हा फुटबॉल स्टेडियममध्ये काही दिवसांसाठी हॉकी स्टेडियमचं रुप दिलं जायचं. पण ओडिशा सरकारने फक्त हॉकीसाठी स्टेडियम उभारलं. राउरकेलातील सध्याची एअर स्ट्रिप जी आतापर्यंत केवळ स्टील प्लांटसाठी वापरली जात होती ती खेळाडूंना ये-जा करणाऱ्या चार्टर्ड प्लेनसाठी ओपन करण्यात आली. हेही वाचा : Hockey World Cup 2023 : भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी श्रीजेश बनणार ट्रम्प कार्ड? भारतीय हॉकी संघाचे प्रायोजकत्व केवळ स्टेडियम उभारून किंवा मुलभूत सुविधा पुरवून ओडिशा सरकार थांबले नाही. तर त्यांनी देशाच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाची स्पॉन्सरशिप घेतली. 2018 च्या आधी खेळांमध्ये भारताच्या सर्व संघांचे प्रायोजक सहारा हे होते. पण सहारा समुह आर्थिक संकटात सापडल्यानंतर त्यांनी सर्व संघांचे प्रायोजकत्व काढले. यानंतर हॉकी इंडियाला प्रायोजक मिळत नव्हता तेव्हा ओडिशाने पुढे येत प्रोयजकत्व स्वीकारलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर ही स्पॉन्सरशिप 2033 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याआधी हा करार फक्त 2023 पर्यंत होता. इतकंच नाही तर हॉकीच्या प्रसारासाठी राज्यात 7 हजार ग्रामपंचायतींमध्ये एलईडी स्क्रीनवरून सामने लाइव्ह दाखवण्यात येणार आहेत. कसं मिळालं यजमानपद आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने डिसेंबर 2018 मध्ये घोषणा केली होती की, 2022 मध्ये हॉकी वर्ल्ड कप जुलै किंवा जानेवारी 2023 मध्ये आयोजित केला जाईल. बेल्जियम, जर्मनी, मलेशिया, स्पेन आणि भारताने यासाठी बोली लावली होती. मात्र जर्मनी, स्पेनने नाव मागे घेतलं. बेल्जियम आणि मलेशियाने जुलै महिन्यात स्पर्धेसाठी बोली लावली तर भारताने जानेवारी 2023 मध्ये स्पर्धा खेळवण्यासाठी आपलं नाव दिल आणि यजमानपद भारताकडे आलं. हॉकी ओडिशाने वर्ल्ड कपचे आय़ोजन भुवनेश्वर आणि राउरकेला इथं करण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या