टीम इंडियाकडून मुकेश कुमार करणार टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण
मुंबई, 20 जुलै : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात टेस्ट सिरीजमधील दुसरा सामना खेळवला जात आहे. त्रिनिदाद येथे खेळवल्या जात असलेल्या सामन्यात टीम इंडियाकडून गोलंदाज मुकेश कुमार हा टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी टॉस झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने मुकेश कुमारच्या नावाची घोषणा केली. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज सोबत टेस्ट सिरीजमधील पहिला सामना जिंकला. यानंतर आज दुसऱ्या सामन्यासाठी वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियात बदल करण्यात आल्याचे सांगितले. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर हा फिट नसल्याने त्याच्याजागी मुकेश कुमारला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
मुकेश कुमार हा मूळचा बिहारमधील गोपीगंज येथील असून तो पश्चिम बंगालकडून खेळतो. मुकेश कुमार या उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 123 विकेट्स घेतल्या आहेत. तर आयपीएल 2023 मध्ये देखील त्याचे प्रदर्शन चांगले राहिले असून त्याने दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना 10 सामन्यात एकूण 7 विकेट्स घेतल्या आहेत. मुकेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.