मुंबई, 24 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) एकही मॅच खेळण्याची संधी मिळाली नाही. मागच्या 2 वर्षांपासून अर्जुन मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) आहे, पण अजूनही त्याची आयपीएल पदार्पणाची प्रतिक्षा कायम आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळे प्ले-ऑफचं आव्हान संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने युवा खेळाडूंना संधी दिली जाईल, असं सांगितलं. रोहितच्या या वक्तव्यानंतर अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण होईल, असं वाटत होतं, पण मुंबईने अर्जुनला बेंचवरच बसवलं. अर्जुन तेंडुलकरला संधी न दिल्यामुळे अनेक माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेट रसिकांनी नाराजी व्यक्त केली होती. या मुद्द्यावर आता मुंबईचा मेंटर आणि अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकरने प्रतिक्रिया दिली आहे. टीम निवडीमध्ये ही हस्तक्षेप करत नाही, असं सचिन म्हणाला आहे. ‘हा वेगळा प्रश्न आहे. मला काय वाटतं आणि मी काय विचार करतो, हे महत्त्वाचं नाही. मोसम आता संपला आहे,’ असं सचिन सचइनसाईट या कार्यक्रमात अर्जुनच्या प्रश्नावर बोलताना म्हणाला. ‘अर्जुनसोबतचं माझं संभाषण नेहमीच पुढचा मार्ग खडतर असणार, यावरच असतं. तुला या खेळाविषयी प्रेम आहे म्हणून तू क्रिकेट खेळायला सुरूवात केलीस, पुढेही हेच करत राहा, कठोर मेहनत घेत राहा, त्यानंतर यश मिळेल, असं मी अर्जुनला सांगतो,’ अशी प्रतिक्रिया सचिनने दिली. ‘टीम निवडीमध्ये मी कधीही सहभागी होत नाही, याबाबत टीम मॅनेजमेंटच निर्णय घेते, कारण मी कायमच याच पद्धतीने वागत आला आहे,’ असं वक्तव्य सचिनने केलं. 22 वर्षांच्या अर्जुन तेंडुलकरने स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून 2 टी-20 मॅच खेळल्या आहेत. याशिवाय तो टी-20 मुंबई लीगमध्येही खेळला आहे. मुंबई इंडियन्सने अर्जुनला लिलावामध्ये 30 लाख रुपयांना विकत घेतलं.