मुंबई, 8 एप्रिल : गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सविरुद्धच्या (Gujarat Titans vs Punjab Kings) सामन्यात युवा फास्ट बॉलरला संधी दिली. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरच्या या सामन्यात (IPL 2022) गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. या सामन्यात विजय शंकर आणि वरुण एरॉन यांच्याऐवजी गुजरातने दर्शन नालकंडे (Darshan Nalkande) आणि साई सुदर्शन यांना मैदानात उतरवलं. या दोघांचाही हा पहिलाच आयपीएल सामना आहे. दर्शन याआधी पंजाब किंग्ससोबत होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात दर्शनने उल्लेखनीय कामगिरी केली. दर्शनने 3 ओव्हरमध्ये 37 रन देत 2 विकेट घेतल्या. त्याने जितेश शर्मा आणि ओडियन स्मिथ यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. लागोपाठ दोन बॉलला दर्शनला दोन विकेट मिळाल्या, त्यामुळे तो हॅट्रिकवरही होता, पण यात त्याला यश आलं नाही. आयपीएल 2022 लिलावामध्ये गुजरातने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं, त्यानंतर आता त्याला पदार्पणाची संधी मिळाली. दर्शन विदर्भाकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये कर्नाटकविरुद्ध त्याने विक्रमी बॉलिंग केली होती. या सामन्यात त्याने 4 बॉलमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. दर्शन नालकंडेने सेमी फायनलमध्ये ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला अनिरुद्ध जोशी, तिसऱ्या बॉलवर बीआर शरथ, चौथ्या बॉलवर जगदीश सुचित आणि पाचव्या बॉलवर अभिनव मनोहर यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. दर्शनने 4 बॉलमध्ये 4 विकेट घेतल्या तरी विदर्भाचा या सामन्यात 4 रनने पराभव झाला, पण दर्शनने त्याच्या या कामगिरीने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. दर्शनने त्याच्या क्रिकेट करियरची सुरूवात फास्ट बॉलर म्हणून केली होती, पण हळूहळू त्याने बॅटिंगमध्येही सुधारणा केली आणि आता तो ऑलराऊंडर म्हणून खेळतो. अंडर-19 वर्ल्ड कपच्या संभाव्य टीममध्ये त्याची निवड झाली होती, पण त्याला अंतिम टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. अंडर-23 सीके नायुडू ट्रॉफीमध्येही दर्शनने बॅट आणि बॉलने धमाका केला. या कामगिरीमुळे त्याची 2018 साली विदर्भाच्या विजय हजारे ट्रॉफी टीममध्ये निवड झाली. महाराष्ट्राविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने 2 विकेट घेतल्या, तसंच आव्हानाचा पाठलाग करत 53 रनची खेळी केली आणि टीमला विजय मिळवून दिला. यानंतर दर्शनने महाराष्ट्राविरुद्ध रणजी ट्रॉफीमध्येही पदार्पण केलं. दर्शनने आतापर्यंत 3 प्रथम श्रेणी मॅच, 22 टी-20 आणि 17 लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. टी-20 मध्ये त्याच्या नावावर 43 विकेट आहेत, तर लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एक-एक अर्धशतक आहे.