कोलंबिया, 17 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यात त्रिवेंद्रममध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचे दोन खेळाडू क्षेत्ररक्षण करताना एकमेकांना धडकले होते. दोघांची धडक इतकी जोरात होती की त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. सामन्याच्या ४३ व्या षटकात विराट कोहलीने मारलेला चेंडू अडवताना जेफरी वेंडरसे आणि अशेन बंडारा हे धडकले होते. आता ते श्रीलंकेला पोहोचले असून त्यांचे फोटो समोर आले आहेत. सोमवारी श्रीलंकेचे खेळाडू जेफरी वेंडरसे आणि अशेन बंडारा हे एअरपोर्टवर दिसून आले. दोघेही स्टिक्सच्या सहाय्याने चालताना दिसले. दोघांच्याही एका पायाला सपोर्टिंग एलीमेंट बांधलेले होते. यावरून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असल्याचं दिसतं. त्यांना फ्रँक्चर झालं आहे की मार लागला आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
श्रीलंकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांना संधी दिली होती. पण त्यांना फारशी चमक दाखवता आली नव्हती. दोघेही फलंदाजी करू शकले नव्हते. दोघे जखमी झाल्याने सबस्टिट्यूट मिळाले पण एकाला फलंदाजी करता आली नाही. या सामन्यात श्रीलंकेला भारताने ३१७ धावांनी धूळ चारली. धावांच्या फरकाने एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला.