गुवाहाटी, 10 जानेवारी : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 67 रननी दणदणीत विजय झाला. या सामन्यात टीम इंडियाचा फास्ट बॉलर उमरान मलिकने त्याच्या भेदक फास्ट बॉलिंगने आग ओकली आहे. या सामन्यात उमरान मलिकने विक्रमाला गवसणी घातली. उमरान मलिक हा सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय बॉलर बनला आहे. मॅचच्या 14 व्या ओव्हरमध्ये उमरान मलिकच्या बॉलिंगसमोर खेळताना श्रीलंकेच्या बॅटरना संघर्ष करावा लागत होता. या ओव्हरमध्ये मलिकने तब्बल 156 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला. याचसह उमरान मलिकने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात उमरान मलिकने 155 किमी प्रती तासाच्या वेगाने बॉल टाकला. त्यावेळी मलिकने जसप्रीत बुमराहाचा विक्रम मोडला होता. याआधी बुमराहाच्या नावावर 153.36 किमी प्रती तासाच्या वेगाने सगळ्यात जलद बॉल टाकला होता, पण आता उमरान मलिकने भारताकडून सगळ्यात जलद दोन बॉल टाकले आहेत.
भारताने दिलेल्या 374 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेला 50 ओव्हरमध्ये 306/8 पर्यंत मजल मारता आली. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका यांनी नाबाद शतक केलं, पण त्याचं हे शतकही श्रीलंकेला वाचवू शकलं नाही. भारताकडून उमरान मलिकने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर मोहम्मद सिराजला 2 विकेट मिळाल्या. मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. श्रीलंकेने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर विराट कोहलीने शतक केलं, तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी अर्धशतकं झळकावली.