Asia Cup 2022 India vs Pakistan
दुबई, 28 ऑगस्ट : आशिया कपच्या (Asia Cup) दुसऱ्या सामन्यात रविवारी भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan) मुकाबला होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. या मॅचमध्ये पाकिस्तानची संपूर्ण टीम काळी पट्टी बांधून मैदानात उतरणार आहे. पाकिस्तानमधल्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) याचा पुढाकार घेतला आहे. पाकिस्तानमध्ये मागच्या काही दिवसांपासून पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. मागच्या 24 तासांमध्ये पावसामुळे पाकिस्तानात 119 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 76 मृत्यू सिंध प्रांतात झाले आहेत, त्याशिवाय खैबर फख्तूनख्वामध्ये 31, गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये 6 आणि बलुचिस्तानमध्ये 4 जणांना पुरामुळे जीव गमवावा लागला. पाकिस्तानमध्ये सध्या 110 जिल्ह्यांमध्ये पूर आहे. 72 जिल्हे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. सर्व्हेनुसार पुरामुळे 3 कोटींपेक्षा जास्त लोक प्रभावित झाले आहेत. 9.5 लाख घरांचं पूर्णपणे नुकसान झालं आहे, तर 6.50 लाख घरांचं थोडंफार नुकसान झालंय. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने पूरग्रस्तांच्या मदतीची घोषणा केली आहे. पाकिस्तानचे नागरिक सध्या कठीण काळातून जात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत. टीम म्हणून आम्ही नागरिकांची मदत करणार आहोत, असं बाबर आझम मॅचआधीच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. मागच्या वर्षी भारताचा पराभव मागच्या वर्षी ऑक्टोबर 2021 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने दारूण पराभव केला होता. त्या सामन्यात शाहिन आफ्रिदीने रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलची विकेट घेत भारताच्या टॉप ऑर्डरला धक्के दिले, त्यामुळे भारताला मोठा स्कोअर करता आला नाही. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने एकही विकेट न गमावता आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. आशिया कपमध्ये शाहिन आफ्रिदी दुखापतीमुळे खेळणार नाही. तर भारताकडून जसप्रीत बुमराहही दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. भारताची बाजू मजबूत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 मॅच झाल्या आहेत, यात भारताने 8 आणि पाकिस्तानने 5 मॅच जिंकल्या आहेत तर एका मॅचचा निकाल लागला नाही. भारताने सर्वाधिक 7 वेळा आशिया कप जिंकला आहे.