हार्दिकनंतर कुलदीपने दाखवला बॉलिंगचा जलवा, ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ माघारी
मुंबई, 22 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज चेन्नई येथे वनडे मालिकेतील शेवटचा सामना सुरु आहे. वनडे मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत असून तिसरा सामना जिंकून दोन्ही संघ मालिका विजय मिळवू शकतात. चेन्नईच्या स्टेडियमवर मालिकेतील तिसरा सामना खेळवला जात असून या सामन्यात हार्दिक पांड्या पाठोपाठ कुलदीप यादव देखील टीम इंडियासाठी संकटमोचक बनला आहे. तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला हार्दिक पांड्याने आपल्या भेदक गोलंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना एकामागोमाग एक विकेट घेऊन तंबूत धाडले होते. हार्दिक पांड्या ने गोलंदाजी करताना 11 व्या षटकात ट्रॅव्हिस हेड, 13 व्या षटकात स्टीव स्मिथ तर 15 व्या षटकात मिचेल मार्शची विकेट घेतली होती. हार्दिकने 3 विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडले होते त्यानंतर आता कुलदीप यादवने देखील ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भेदक गोलंदाजीने त्रस्त केले.
कुलदीप यादवने २५ व्या षटकात डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. यावेळी कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर शॉट मारण्याच्या नादात वॉर्नरने टोलवलेला चेंडू हार्दिक पांड्याने पकडकला. त्यानंतर 29 व्या षटकात पुन्हा कुलदीपने टाकलेल्या चेंडूवर शॉट मारताना मार्नस लॅबुशेन हा झेल बाद झाला. शुभमन गिलने त्याचा कॅच पकडला. यानंतर पुन्हा 39 व्या षटकात कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवून अॅलेक्स कॅरी याची विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 7 विकेट्स गमावून 19 व्या शतकापर्यंत 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे.