भुवनेश्वर, 19 जानेवारी : हॉकी वर्ल्ड कपमध्ये आज डी पूलमध्ये भारत आणि वेल्स यांच्यात सामना होणार आहे. भारतीय संघाने 2 सामन्यात 4 गुण मिळवून क्वार्टर फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. दरम्यान, वेल्सचा संघ पहिले सलग दोन सामने पराभूत झाला. यामुळे ते बाद फेरीत पोहचण्याच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. दरम्यान, वेल्सच्या संघाने इथपर्यंत मारलेली मजल इतर देशांसाठी तितकीच प्रेरणा देणारी आहे. वेल्सच्या संघात असे खेळाडू आहेत ज्यांचं आयुष्यात करिअर म्हणून हॉकीशिवाय वेगळा पर्याय आहे. या संघात कुणी वैज्ञानिक आहे, कुणी इंजिनिअर तर कुणी शिक्षकही आहे. बहुतांश खेळाडू हे काम करतात आणि पार्टटाइम हॉकी खेळतात. याच त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळे वर्ल्ड कपसाठी ते पात्र ठरले. पण भारतात येण्यासाठी संघाकडे पैसे नव्हते. यासाठी स्वत:चे पैसे आणि वर्गणी गोळा करून वेल्समधून भुवनेश्वरला पोहोचले. वेल्सच्या संघाला ना सरकारकडून काही मदत मिळते ना कार्पोरेट जगतातून. सर्व खर्च संघातील खेळाडू करतात. त्यासाठी वर्षाला प्रत्येकजण जवळपास 1 लाख रुपयांचे योगदान देतो. यातून हॉकी स्टिक, बॉल आणि इतर साहित्याचा खर्च निघतो. वेल्सचा संघ वर्ल्ड रँकिंगमध्ये टॉप 30 मधून बाहेर होता, पण आता टॉप 15 मध्ये आहे. सतत संघाच्या कामगिरीत सुधारणा करताना इतिहास घडवला आणि पहिल्यांदा वर्ल्ड कपसाठी ते पात्र ठरले. हेही वाचा : ओडिशा कसे बनले भारतीय हॉकीचा ‘तारणहार’? वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा दुसऱ्यांदा मान स्वखर्चाने भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात यायचा खर्च कसा करायचा असा प्रश्न संघासमोर होता. यासाठी क्राउड फंडिंगच्या माध्यमातून वर्गणी गोळा करून भारतात येण्याचा निर्णय घेतला. किमान 25 लाख रुपये जमवण्याचे लक्ष्य होते. पण क्राउड फंडिगमधून फक्त पाच लाख रुपये मिळाले. शेवटी सर्व खेळाडूंनी स्वखर्चाने वर्ल्ड कप खेळण्यासाठी येण्याचा निर्णय घेतला. सरावातही अडचण वेल्सच्या संघात एक बायो सायंटिस्ट, एक इंजिनिअर आहे, तर तिघेजण शाळेत शिकवण्याचं काम करतात. एक खेळाडू जीम ट्रेनर, तर एक न्यूट्रिशनिस्टचं काम करतो. दररोजचा सराव करणंही या खेळाडूंना कठीण असतं. सोमवार ते शुक्रवार सर्वजण आपल्या कामात असतात आणि शनिवारी, रविवारी वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये येऊन हॉकीचा सराव करतात. कोणत्याही मोठ्या स्पर्धेसाठी चांगला सराव व्हावा म्हणून त्यांना ऑफिसमधून आठवडाभर सुट्टी घ्यावी लागते. त्यामुळे त्यांचा पगारसुद्धा कापला जातो. हेही वाचा : Hockey World Cup 2023 : भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यासाठी श्रीजेश बनणार ट्रम्प कार्ड? देशात सुविधांचा अभाव भारतात वर्ल्ड कप खेळण्यासाठी वेल्सचा संघ आलाय. पण वेल्सच्या प्रशिक्षकांनी सांगितलं की हॉकीसाठी आमच्या देशात अशा सुविधा नाहीत. कार्डिफमध्ये एकच मैदान आहे आणि तिथं केवळ 400 लोकच सामना पाहू शकतात. बहुतांश खेळाडू हे आवड म्हणून हॉकी खेळतात. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून एक ग्रुप सतत हॉकी खेळतो. दर शुक्रवार, शनिवार कार्डिफमध्ये येऊन सराव करतात आणि सोमवारी पुन्हा कामावर परत जातात. ऑलिम्पिकमध्ये एकमेव पदक पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये जरी खेळत असले तरी वेल्सच्या संघाने ऑलिम्पिकमध्ये 1908 मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं होतं. त्यानंतर संघाची अवस्था बिकट झाली. संघ ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनचा भाग झाला. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेतला पण त्यात आतापर्यंत पदक जिंकता आलेलं नाही. 2017 मध्ये युरो हॉकी चॅम्पियनशिप ii मध्ये सिल्व्हर मेडल पटकावलंय. तर 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सहाव्या स्थानापर्यंत ते पोहोचले होते. हॉकी वर्ल्ड कपचे फॅनकोडवर प्रसारण हॉकी वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान सलग दुसऱ्यांदा ओडिशाला मिळाला असून भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन ठिकाणी आय़ोजन करण्यात आले आहे. भारताने एक सामना जिंकला तर एक बरोबरीत सुटला. आज तिसरा सामना वेल्ससोबत भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. हॉकी वर्ल्ड कपचे सर्व सामने फॅनकोड ॲप (अँड्रॉइड, आयओएस, टीव्ही) आणि www.fancode.com या वेबसाइटवर पाहता येतात.