भुवनेश्वर, 13 जानेवारी : भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीमध्ये देशाने अखेरचा वर्ल्ड कप 1975 मध्ये जिंकला होता. त्यानंतर गेल्या 47 वर्षात भारताला सेमीफायनलपर्यंतही मजल मारता आलेली नाही. त्यामुळे भारताच्या हॉकी संघाला विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. आजपासून हॉकी वर्ल्ड कप ला सुरुवात होत असून भारताचा पहिला सामना स्पेनविरुद्ध सायंकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. भारत आता 47 वर्षांनी पुन्हा कमाल करणार का? याची चर्चा रंगली आहे. हॉकी असो किंवा इतर कोणताही खेळ, त्यासाठी 47 वर्षांचा कालखंड खूप मोठा असतो. या काळात हॉकीत टर्फपासून ते टॅक्टिजपर्यंत बरंच काही बदललं आहे. पण आतापर्यंत भारताला 47 वर्षात एकदाही टॉप 3 मध्ये पोहोचता आलेलं नाही. भारतीय हॉकी संघाच्या नेतृत्वाची धुरा हरमनप्रीत सिंगकडे आहे. तर भारताचा गोलकीपर पी. आर. श्रीजेश असून तो सध्या भारताच्या हॉकी संघातला सर्वात अनुभवी खेळाडू आहे. श्रीजेशचा हा चौथा वर्ल्ड कप असून त्याच्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्याची ही अखेरची संधी असणार आहे. त्यामुळे श्रीजेश त्याच्यासह कोट्यवधी भारतीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. हेही वाचा : चक दे इंडिया! आजपासून हॉकी वर्ल्ड कपला सुरुवात; भारत आणि स्पेन भिडणार हॉकीमध्ये भारताने अखेरचा मोठा विजय 2021 मध्ये मिळवला होता. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने कांस्यपद पटकावलं होतं. ऑलिम्पिकमध्येही भारताने हा विजय 41 वर्षांनी मिळवला होता. टोक्यो ऑलिम्पिकआधी भारताने 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. तर एशियन गेम्समध्ये 32 वर्षांनंतर 1998 मध्ये विजय मिळवला होता. गेल्या ४७ वर्षात भारताने वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे खेळाडू खेळवले. तर भारतासह परदेशातील प्रशिक्षकही नेमले. मात्र तरीही भारताला मोठं यश मिळवता आलेलं नाही. “भारताचा यावेळचा संघ गेल्या दोन वर्षांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तसंच प्रशिक्षक ग्राहम रीडही जबरदस्त असं काम करत असून गेल्या दोन दशकातील यावेळचा भारताचा संघ हा सर्वोत्तम आहे’, असं मत भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार वासुदेवन भास्करन यांनी व्यक्त केलंय. श्रीजेश भारताच्या हॉकी संघात 2006 पासून खेळत आहे. त्याची सुरुवात फारशी चांगली नव्हती. मात्र 2011 च्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्याने श्रीजेशचं नशिब बदललं. त्यानतंर 2013 आणि 2014 च्या एशियन गेम्समध्ये भारताच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. हेही वाचा : 2 हजारहून अधिक काडीपेटी, ओडिशाच्या मुलानं तयार केली हॉकी वर्ल्ड कपची प्रतिकृती! 2018 च्या एशियन गेम्समध्ये श्रीजेशच्या करिअरमध्ये अनेक चढउतार आले. त्यानतंर त्याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. टोकियो ऑलिम्पिकवेळी त्याला संघात ठेवायचं की नाही यावरून ट्रोलही केलं गेलं. दरम्यान, आपल्या कामगिरीने श्रीजेशने टीकाकारांना उत्तर दिलं. ऑलिम्पिकमध्ये त्याने गोलकीपर म्हणून भारतासाठी अनेक गोल वाचवले. त्यामुळेच भारताचं ऑलिम्पिकमध्ये एखादं मेडल जिंकण्याचं स्वप्न 41 वर्षांनी पूर्ण झालं. क्रीडा क्षेत्रात इम्रान खान, सचिन तेंडुलकर, लियोनेल मेस्सी यांसारख्या खेळाडूंचे अखेरच्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तर ब्रायन लारा, धनराज पिल्लई, वेन रूनी, राहुल द्रविड आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांसारख्या दिग्गजांचं स्वप्न अधुरं राहिलं. त्यामुळे आता श्रीजेशला त्याच्या अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत देशाला वर्ल्ड कप जिंकून देण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. भारताने जर वर्ल्ड कप जिंकला तर नक्कीच भारतीय हॉकीला पुन्हा सोनेरी दिवस येतील.