भुवनेश्वर, 15 जानेवारी : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला सामना अनिर्णित राहिला. स्पेनविरुद्ध विजय मिळवणाऱ्या भारतीय संघ इंग्लंडला पराभूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरला होता. मात्र इंग्लंडच्या संघानेही तुल्यबळ लढत दिली आणि सामना ०-० असा बरोबरीत संपला. भारताने पहिल्या सामन्यात स्पेनला तर इंग्लंडने वेल्सला पराभूत केलं होतं. दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. मात्र हा सामना अनिर्णित राहिल्याने दोन्ही संघांचे समान ४-४ गुण झाले आहेत. चांगल्या गोल फरकाने इंग्लंडने पहिला सामना जिंकल्याने ते गुणतालिकेत पहिल्या क्रमाकावर आहेत. आता भारताचा अखेरचा सामना वेल्ससोबत तर इंग्लंडचा शेवटचा सामना स्पेनसोबत आहे. हेही वाचा : ओडिशा कसे बनले भारतीय हॉकीचा ‘तारणहार’? वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा दुसऱ्यांदा मान इंग्लंडने पहिल्या क्वार्टरमध्ये चांगली सुरुवात करत पाच पेनल्टी कॉर्नर मिळवले होते तर भारताला फक्त एकच पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने तीन तर इंग्लंडने दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. तरीही दोन्ही क्वार्टमध्ये एकही गोल झाला नाही. तर तिसऱ्या क्वार्रटरमध्ये भारताने आक्रमक खेळा केला पण गोल नोंदवता आला नाही. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये भारताचे दोन खेळाडू अमिर रोहिदास आणि जरमनप्रीत सिंहला ग्रीन कार्ड मिळालं. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या काही मिनिटात गोल करण्याचा प्रयत्न करता आला नाही. इंग्लंडला ५९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता पण भारताच्या बचावफळीने गोल होऊ दिला नाही आणि सामना बरोबरीत सुटला. सामन्यात भारताने चार तर इंग्लंडने ८ पेनल्टी कॉर्नर मिळवले. तरीसुद्धा एकही गोल सामन्यात होऊ शकला नाही. पण १२ पेनल्टी कॉर्नरमुळे सामना रोमहर्षक झाला.