नवी दिल्ली, 05 जानेवारी: क्रिकेट (Cricket) आणि सट्टेबाजी (Betting) यांमधील समीकरणाबद्दल नेहमीच चर्चा सुरू असते. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात क्रिकेटचा हंगामही थंडावलेलाच होता, त्याला चालना मिळाली ती आयपीएल सामन्यांमुळे (IPL). हे सामने क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच होते. मात्र याच सामन्यांदरम्यान एका भारतीय खेळाडूला दिल्लीतील एका महिला नर्सनं सट्टा लावण्यासाठी सामन्याबद्दल आणि खेळाडूंबद्दल माहिती विचारल्याची घटना समोर आली आहे. 30 सप्टेंबर रोजी ही घटना घडल्याचं स्पष्ट झालं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे. दरम्यान, या क्रिकेटपटूने त्या महिलेला अशी कोणतीही माहिती विचारू नये अशी सक्त ताकीद दिली आणि पोलिसात तक्रार करण्याचाही इशारा दिला. या दोघांचे बोलणं सोशल मीडियाच्या माध्यमातून झालं. या सर्व प्रकाराची माहिती या क्रिकेटपटूनं ताबडतोब भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयला (BCCI) दिली होती. (हे वाचा- केन विल्यमसननं झळकावलं 2021 मधील पहिलं द्विशतक! ) त्यानंतर सर्व माहिती घेऊन बीसीसीआयनं त्या महिलेची चौकशीही केली, मात्र कोणताही गैरप्रकार झाल्याचं आढळलं नसल्यानं या प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) लाचलुचपत प्रतिबंधक समितीचे (Anti Corruption Committee) प्रमुख अजित सिंह यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं. याबाबत अधिक माहिती देताना अजित सिंह म्हणाले, आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्या क्रिकेटपटूला माहिती विचारणारी महिला कोणत्याही सट्टेबाजीशी संबंधित सिंडीकेटशी (Betting Syndicate) निगडीत नाही. ती व्यावसायिक सट्टेबाजही नसल्याचं चौकशीत सिद्ध झालं आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली. तेव्हा या महिलेनं आपण या क्रिकेटपटूचे चाहते असल्याचा दावा करत, ती डॉक्टर असून, दिल्लीतील एका खासगी रूग्णालयात कार्यरत असल्याचं सांगितलं होतं. या क्रिकेटपटूनं अलीकडेच कोविड संसर्गापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तिच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधला होता. मात्र त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नाही.’ (हे वाचा- IND vs AUS: सिडनीमध्ये टीम इंडियाच्या नावानं डिनर घोटाळा! ) त्यांच्या ऑनलाइन संभाषणा दरम्यान, तिनं सट्टा लावायचा असून, माहिती देण्यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यानं स्पष्ट नकार दिला, या क्रिकेटपटूची आणि तिची कधीही प्रत्यक्षात भेट झालेली नाही. ती कुठं राहते किंवा कुठे काम करते याबाबत त्याला कोणतीही माहिती नाही, असंही बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. साधारण एक महिन्यापूर्वी अशीच एक तक्रार आणखी एका खेळाडूनं बीसीसीआयकडं केली होती. त्या खेळाडूच्या परिचयातील व्यक्तीनेही अशीच माहिती विचारली होती, त्याबद्दल संशय आल्यानं त्यानं संघाच्या व्यवस्थापनाला या प्रकारची माहिती दिली होती.